मराठवाडय़ाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल लक्ष वेधतानाच मराठवाडय़ाचे स्वतंत्र राज्य व्हावे, या मागणीचे निवेदन लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विचार मंचचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष आपल्याकडे स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीचे निवेदन घेऊन आले होते, असे सांगून त्यांची भूमिका आपल्याला योग्य वाटली म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे १६ मार्च रोजी हे निवेदन दिले. लातूर शहराच्या पाणीप्रश्नापासून मराठवाडय़ाचे अनेक विकासाचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. छोटी राज्ये व्हावीत, ही भाजपची भूमिका आहे. छोटे राज्य झाल्यामुळे त्यांची प्रगती झपाटय़ाने होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही हीच भूमिका होती. आपणही हीच भूमिका घेत पंतप्रधानांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र मराठवाडा झाला तर उजनीहून लातूरला पाणी आणण्यासाठी निधी उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला.