Donkey Market in Maharashtra: राज्यात गाढवाची संख्या झपाट्याने कमी झाली असून सरकार दप्तरी केवळ ११५४९ गाढवे आहेत. यातील सर्वाधिक गाढवे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३३०३ गाढवे आहेत. याच जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे सध्या गाढवांचा बाजार भरला आहे.

तुम्हाला माहिती आहे एका गाढवाची किंमत किती ? गदर्भच ते त्याची किंमत असून असेल किती ? नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत दोन हजाराहून अधिक गाढवे विक्रीला आले आहेत. एका गाढवाची किंमत आहे ४० ते ५० हजार.

तसे गाढवाच्या तीन श्रेणी. गावच्या बुटक्या गाढवाची किंमत तशी सर्वात कमी. ती दहा ते १२ हजार एवढीच. काठेवाडी घोडे तसेच गाढवे सुद्धा आहेत. त्यांची किंमत अधिक. काही बुटक्या गाढवाची किंमती १२ हजार रुपयांपर्यंत. गाढविणीच्या दुधामुळे गाढवाच्या किंमती वाढल्याचे व्यापारी सांगतात.

लोहा तालुक्यातील माळेगावमध्ये मोठा पशुबाजार भरतो. गेल्या काही वर्षात जड वाहतूक करण्यासाठी गाढवांची गरज भासत नसली तरी ग्रामीण भागातील भटक्या समाजात त्याच्या खरेदी विक्रीचे महत्त्व अजूनही आहे. माळेगावच्या यात्रेत या वर्षी अडीच – तीन हजार गाढवे आले आहेत. काही बुटकी गाढवे तुळजापूर, उदगीर, उमरगा. नांदेड, लोहा , बार्शी व सोलापूर येथून आल्याचे व्यापारी राम काळे यांनी सांगितले. कर्नाटक आणि तेलंगणामधूनही गाढवे विक्रीसाठी येतात. जेजुरी, देऊळगावराजा आणि लोहा तालुक्यात गाढवाचे बाजार भरतात. या वर्षी गाढवाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा त्यात चार ते पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. कुंभार, कैकाडी, वैद्यू, वडार या समाजातील मंडळी गाढव खरेदी विक्रीसाठी यात्रांमध्ये येत आहेत. माळेगावच्या यात्रेत पूर्वी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे घोडेही जात. या यात्रेला देशमुख कुटुंबीय जात असल्याने त्याची चर्चा होत असे. आताही यात्रा तेवढ्याच उत्साहात भरत असून या वर्षीच्या यात्रेतील गाढव बाजारा गर्दभ किंमत वाढली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती गाढवे ?

नांदेड पाठोपाठ अमरावतीमध्ये १७७१ गाढवे असून सांगलीमध्ये ७८४ तर अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी १०० ते २०० एवढीच गाढवे आहेत. काही जिल्ह्यांमध्ये गाढवच पहावयास मिळत नाही. यात भंडारा, गोंदीया, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. गाढवाची संख्या कमी होत असल्याने पर्यावरण प्रेमी ही समस्या असल्याचे सांगतात.

गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्याची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून आवर्जून केले जाते. यात्रेत या वर्षी उंट बाजारही बहरला आहे. केवळ लहान मुलांच्या रपेटीसाठी उंट खरेदी विक्री होतात असे सांगण्यात येते. एका उंटाची किंमत आता ८० ते ९० हजार रुपये असल्याचे माळेगावमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.