छत्रपती संभाजीनगर : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील एका व्यक्तीचे पैशांच्या व्यवहारातून अपहरण करत त्याला बीड जिल्ह्यात आणत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना शनिवारी दुपारी मिळाली. त्यावरून त्यांनी सापळा रचून अपहरणाचा डाव मोडून काढत एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांना व सुटका केलेल्या व्यक्तीला रविवारी औंढा नागनाथ पोलीस पथकाकडे सोपवण्यात आल्याची माहिती बीड पोलीस विभागाकडून देण्यात आली.
बळीराम लिंबाजी सावंत असे सुटका केलेल्या व्यक्तीचे तर नामदेव माणिक घोळवे (रा. अंबेवडगाव ता. धारूर), नागराबाई सुदाम तोंडे (रा. परभणी, ह.मु. जवळाबाजार) व बाबूराव गोविंदराव बडे (कासारी, ता. धारूर), अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांना अपहरण करण्यासाठी वापरलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना औंढा येथील बळीराम सावंत यांचे काही जणांनी अपहरण केले असून त्यांना एका कारमधून बीड जिल्ह्याच्या दिशेने आणण्यात येत असल्याची माहिती शनिवारी दुपारी मिळाली. त्यांनी ती माहिती दिंद्रुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे यांना कळवली. तसेच कारचे लोकेशन माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दाखवण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यानुसार महादेव ढाकणे यांनी त्यांचे एक पथक तयार करून तेलगाव परिसरात पाठवले.
खटावकर यांनी सांगितलेल्या क्रमांकाच्या कारचा शोध घेत असताना कार तेलगाव चौकात दिसून आली. या कारमध्ये अपहृत बळीराम सावंत व वरील आरोपी असल्याचे निदर्शनास आले. बळीराम सावंत याला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपींना व सावंत याला दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आले. रविवारी औंढा नागनाथ पोलिसांकडे आरोपींसह अनहृत बळीराम सावंत याला सुपूर्द केल्याची माहिती बीड पोलीस विभागाकडून देण्यात आली.