लॉकडाऊनमध्ये बाहेर जाण्यास बंदी असल्यामुळे कित्येक जणांनी ऑनलाईन ऑर्डर करण्यास प्राधान्य दिले होते. त्यातच विविध कंपन्यांनीही वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणे सुरू केले होते. पण यातच कित्येकांनी आपल्या ग्राहकांची ऑनलाईन फसवणूकही केली. औरंगाबादमध्येही आता अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीला ऑनलाइन जेवण मागवणं चांगलंच महागात पडलंय. या व्यक्तीला थोडाथोडका नाही तर तब्बल ८९ हजारांचा गंडा बसलाय.

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना एका व्यक्तीने ८९,००० रुपये गमावल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली. औरंगाबाद शहरातील नारेगाव भागातील रहिवासी बाबासाहेब ठोंबरे यांनी जेवणावर डिस्काउंट देणारी जाहिरात सोशल मीडियावर पाहिली. ही जाहिरात शहरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटबद्दल होती. हे रेस्टॉरंट एक वेळच्या जेवणाच्या किमतीत दोन वेळचे जेवण देतं असल्याचं जाहीरातीत म्हटलं होतं. त्यानंतर बाबासाहेब ठोंबरे यांनी जेवण ऑर्डर केलं. ऑर्डर करताना त्यांनी क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली आणि त्यांच्या बँक खात्यातून ८९ हजार रुपये कमी झाले. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

याप्रकरणी बाबासाहेब ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.