छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी सुरू असणाऱ्या जरांगे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमूख अभिजीत दिपके शुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान जाणार आहेत. दिपके यांनी पुकारलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनास मनोज जरांगे यांनी भेट दिली होती.

जरांगे यांनी केलेल्या मराठी भाषणाचे दिपके यांनी हिंदीमध्ये रुपांतर केले होते. या आंदोलनास मिळालेल्या यशानंतर जरांगे यांनीही आपणही पुढील वर्षापर्यंत हिंदी शिकू असे माध्यमांना सांगितले होते. दिपके यांच्या भेटीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला.

जरांगे यांच्या उपोषणाचा आज १२ दिवस होता. उपोषण मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. दिपके यांच्या भेटीमुळे आरक्षण मागणीला बळ मिळेल, असा दावा केला जात आहे. दिपके यांनी जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. हे आंदोलन अनेक अंगाने चर्चेत आहे. या आंदोलनातील तरुणांचे नेते दिपके आता जरांगे यांची भेट घेण्यास जाणार आहेत. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत.

आंदोलन भेटीपूर्वी गुरुवारी दिपके यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पुणे येथे आत्महत्या प्रथमेश देशमुख यांच्या आईची परंडा येथे भेट घेतली. लाल दिव्याच्या गाडीतून गावी परत येईन असे सांगणारा मुलगा रुग्णवाहिकेतून आला, असे म्हणत प्रथमेशच्या आईने टाहो फोडला. तरुणांच्या प्रश्न मांडणाऱ्या दिपके यांनी आता जरांगे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. हे सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे.