छत्रपती संभाजीनगर : मला एकटे पाडले जात आहे. माझ्या विरोधात षडयंत्र आहे. मी शांत आहे म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे. माझ्या सहित माझ्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात आहे. मी धागेदोरे शोधत आहे, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.माझ्या विरोधात बैठका घेणे हे उपमुख्यमंत्र्यांचे काम नसते. तुम्ही कितीही लोक अंगावर घातले तरी मी मागे हटणार नाही. पण आपण ज्यांना मित्र म्हणतो तो आपला शत्रू आहे हे जेव्हा समजते तेव्हा धक्का बसतो.

पण कितीही लोक अंगावर घातले तरी मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले. गोड बोलून वेळ घेणार पण त्याचा रोष होऊ देऊ नका. समाजाच्या डोळ्यात पाणी आल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशारा देत जरांगे म्हणाले, सत्तेत येऊन मराठा समाजावर अन्याय करणे बंद करा. आम्हाला त्रास देण्याचे जे षडयंत्र रचले जात आहे ते बंद करा, असेही त्यांनी सरकारला सुनावले.

अंतरवाली सराटीमधील कोणाही विरोधात मी काहीही बोलणार नाही. कोणतीही भगिनी बोलली असेल तरी मी बोलणार नाही. ते गाव समाजासाठी लढले आहे. अंतरवाली सराटी येथील माणूस चुकला तर पोटात घेऊन जा, ते बोलले म्हणून फरक पडणार नाही. गैरसमजातून बोलत असतील, असेही जरांगे म्हणाले. ज्यांना वाटते की आंदोलन अंतरवाली सराटी येथे व्हावे, त्यांनी तिथे पुन्हा मंडप लावावा, असेही जरांगे म्हणाले. जरांगेही या वर्षी पुन्हा दसरा मेळावा घेणार आहेत. नारायणगड येथे दर्शनासाठी सर्वांनी यावे. पण दुष्काळ असल्याने या वर्षी मेळावा छोटा होईल, असेही ते म्हणाले.