छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही पक्षाची बाजू घेऊन अंतरवली सराटी येथे येऊ नये असे आवाहन करत जरांगे यांनी सरकार विरोधाचा इरादा पुन्हा जाहीर केला. यावेळी बावनकुळे आणि संजय शिरसाठ या दोन मंत्र्यांवर टीका केली. जरांगे यांच्या पूर्वीच्या आंदोलनात छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जात. आता मात्र नवे दोन मंत्री त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. अंतरवली सराटीमध्ये आज मराठा आरक्षण प्रश्नांवरील अभ्यासकाची जरांगे यांनी बैठक बोलावली आहे.  दिल्ली येथील आंदोलनास भेट देऊन आल्यानंतर आता आपण हिंदी शिकू आणि २०२९ मध्ये हिंदीमध्ये भाषण करू असेही त्यांनी जाहीर केले आहे.

आपल्या पक्षाला चांगले म्हणणाऱ्यांनी  येऊ नये, विसंगती करण्यासाठी येऊ नका.अशा अभ्यासकांनीही साेडणार नाही, असे जरांगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले. हैदराबाद गॅझेटिअरनुसार सर्वांना प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ज्यांची निवड झाली त्यांनी आपला अर्ज आणावेत. जे येऊ शकत नाहीत त्यांनी  मुलांना पाठवावे आणि आरक्षण प्रमाणपत्र मिळेपर्यंत घरी जायचे नाही, असे ठरवून आंतरवलीस यावे असेही जरांगे म्हणाले.

अण्णासाहेब महामंडळ अंतर्गत ज्यांचे अर्ज बाकी आहे, किंवा योजनेतील व्याज परतावा मिळत नाही यांनी देखील संपूर्ण माहिती घेऊन अर्जासहित अंतरवलीला यावे असेही ते म्हणाले. अभ्यासकांनी बैठकीनंतर पुन्हा माध्यमांमध्ये बोलू नये. काही बैठक उधळण्यासाठीही येतात, असेही जरांगे म्हणाले.  आंदोलन सुरू झाल्यावर सहा महिन्यात गुन्हे मागे घेणार असे सरकार  म्हणाले होते, घेतले का गुन्हे मागे, असा प्रश्नही जरांगे यांनी विचारला. आता वेळप्रसंगी विदर्भातील घराघरापर्यंत जाऊ, असेही जरांगे म्हणाले. 

अभ्यासकांवर टीकात्मक सूर

नीट वागायचे असल्यास अंतरवलीकडे  यावे , नाहीतर येऊ नये, विष कालवण्यासाठी येऊ नका, मी तुम्हाला ओळखतच नाही. सरकारचे ऐकून ज्ञान पाजळू नका, जेव्हा आंदोलन केले तेव्हा माध्यमांसमोर विचारतो या शासन निर्णयामुळे प्रश्न निकाली निघेल का, तेव्हा सगळेजण छान, छान म्हणतात आणि नंतर चुका काढतात. अभ्यासक घरी झोपून राहतात, बायकोचा फोन आला जातात. मग ते येईपर्यंत थांबून रहायचे का, असा प्रश्न उपस्थित करत अभ्यासकांनाही जरांगे यांनी धारेवर धरले.

दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलनाचा प्रभाव लक्षात घेऊन हिंदी शिकण्यासाठी प्रयत्न करु आणि २०२९ मध्ये हिंदीमध्ये भाषण करु असेही जरांग यांनी म्हटले आहे.