छत्रपती संभाजीनगर : घसरत जाणारे रक्तातील साखरेचे प्रमाण, उपोषणा दरम्यान घटलेले सात किलो वजन यामुळे प्रकृती खालावत चालल्याने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री अडीच वाजता केलेल्या विनंतीवरुन मराठा आरक्षण आंदोलक मनाेज जरांगे यांनी सलाईन लावण्यास परवानगी दिली. रात्री उशिरा शरीरात पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी डॉक्टरांनी उपचार केले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ११ दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा ११ वा दिवस आहे.
मराठा आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत बदल करावेत अशी मागणी करत मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषणास बसले आहेत. विविध प्रकारच्या १६ मागण्या पूर्ण केल्याशिवाय उपोषणातून माघार घेणार नाही, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. पुढील काळात आंदोलनाचे स्थळ बदलून ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर केले जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या आंदोलनाला कसे हाताळायचे याची रणनीती ठरवली जात आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आतापर्यंत तीन लाख १५ हजार ८६३ व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे; तर जातवैधता समितीकडे अर्ज करण्यात आलेल्या २० हजार ८५१ जणांपैकी १६ हजार २३ जणांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असणाऱ्या अर्जांची संख्या केवळ ९१ असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समितीसमोर सादर केली.
दरम्यान मंगळवारी दिवसभरात न्या.संदीप शिंदे समिती येणार असल्याचे सांगण्यात येत होते. शिंदे समितीने केलेल्या कामामुळे चर्चेची नवी दारे सरकारला उघडली जातील असे मानले जात आहे. दरम्यान प्रकृतीध्ये होणारे मोठे बदल लक्षात घेऊन जरांगे यांनी सलाईन घेण्यास परवानगी दिल्याने चर्चेला लवकर सुरूवात होईल असे मानले जात आहे. सर्व प्रकारच्या मागण्यांवर सरकार काम करत आहे, त्या पूर्ण होतील, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले असल्याचा दावा जरांगे समर्थकांकडून केला जात आहे.
