छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणातील ५८ लाख नोंदीच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत या जुन्या मागणीसह जात पडताळणीमध्ये नाकारलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, या मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणास बसणार आहेत. दरम्यान उपोषणा दरम्यान चर्चेला जावे लागेल म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. हे उपोषण अंतिम लढा असल्याचा दावा केला जात आहे. हे जरांगे यांचे ११ वे उपोषण आहे.
उपोषणापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर, केवळ ०.३ टक्के नोंदी नाकारल्या आहेत. ज्यांनी अर्ज केला त्यांना प्रमाणपत्र दिले जात असल्याचा दावा केला. मात्र, सरकारचे सर्व दावे फेटाळून शनिवार, २९ ऑगस्टपासून उपोषण करणारच, असे जरांगे यांनी जाहीर केले आहे.
ज्यांना असे वाटते, की त्यांच्याकडे नोंदी आहेत सरकारने जी नियमावली दिली त्यानुसार सर्व कागदपत्रे आहेत, त्यांनी पुढच्या आठ दिवसांत तत्काळ आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत. आम्ही त्यावर तातडीने कारवाई करू, असे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. दोन-चार दाखल्यांच्या संदर्भात जरांगे यांचे आक्षेप होते. त्या संदर्भातही जात पडताळणी समितीच्या सदस्यांनी पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. यामध्ये काही मंडळी उच्च न्यायालयात गेलेली आहेत. त्यामुळे ती न्यायालयीन बाब आहे, असेही विखे म्हणाले.
दरम्यान, आंतरवली सराटीमधील उपोषण आंदोलनाची मोठी तयारी सुरू असल्याचा मराठा संघटनांचा दावा आहे. जरांगे यांच्या उपोषणातून वारंवार येणारी ५८ लाख नोंदीच्या आकडेवारीतील २४ ऑगस्टपर्यंत ज्यांनी अर्ज केले होते अशा १४ लाख ३१ हजार ६३४ जणांपैकी १४ लाख २४ हजार ६३४ जणांना कुणबी प्रमाणपत्र दिले असल्याचा दावा करणारी आकडेवारी सरकारकडून जरांगे यांना देण्यात आली आहे. राज्यात केवळ १७४७ अर्ज प्रलंबित असून, ५२४८ अर्ज नामंजूर करण्यात आले असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, ५८ लाख नोंदींतील प्रत्येकाला प्रमाणपत्र दिलेच पाहिजे, असा जरांगे यांचा आग्रह आहे. मात्र, सरकारकडे अर्ज येत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही आकडेवारी जरांगे यांना देण्यात आली आहे.
धाराशिवमधून रिक्षांची रॅली
जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी धाराशिव जिल्ह्यातून हजार रिक्षांची रॅली काढण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. या रॅलीत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतून रिक्षा घेऊन कार्यकर्ते शनिवारी अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहेत. मोठ्या संख्येने रिक्षा एकाच वेळी मार्गस्थ होणार असल्याने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
