बीड: रात्रीचे दीड वाजलेले. मनोज जरांगे यांचे शरीर १९ दिवसाच्या उपोषणाने पूर्ण थकलेले. असे असताना मुंबईच्या दिशने सुरू असणाऱ्या प्रवासा दरम्यान पाटोदा येथे त्यांनी सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी होती. मराठा समाजबांधव आणि महिलांनी पाटोदा परिसरात मोठी गर्दी करत जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अशक्त झाले असतानाही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला भावनिक साद घातली.
१२ सप्टेंबरपासून सलाईन न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असून हात-पाय हलवणेही कठीण झाले आहे, असे जरांगे म्हणाले. “माझ्या समाजाच्या मुलांच्या भवितव्यासाठी लढताना मी सरकारला अंगावर घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या घालायचे षड्यंत्र रचले आहे, सलाईन घेतले की सरकार निवांत होते आणि सलाईन सोडली की टेन्शनमध्ये येते.’ असे निरीक्षण त्यांनी या वेळी मांडले. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदी मिळाल्या असून अडीच कोटी समाज आरक्षणात गेला आहे. आता गॅझेटसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पाटोद्यावरून पुढे गाड्या न आणण्याचे आणि आपल्या मागे न येण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
“तुम्ही नेत्यांवर आणि पक्षांवर प्रेम करू नका, आरक्षण मिळाल्यावर करा. आपल्यासाठी आपला समाज सर्वात मोठा आहे,” असे ते म्हणाले. उपोषण आणि लढ्याशी तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट करत अशक्तपणा आणि प्रकृतीचे गंभीर कारण असतानाही जरांगे पाटील यांनी पाटोद्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीनुसार पुढील प्रवासाबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गेवराई पासून पाटोद्यापर्यंत क्रेनने हार घालत स्वागत
मनोज जरांगे यांचे बीड जिल्ह्यात गेवराई पासून जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. गेवराई पाठोपाठ बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, मांजरसुंबा चौकात आणि त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता पाटोदा शहरात मनोज जरांगे यांचे भल्या मोठ्या क्रेनला हार लावून स्वागत करण्यात आले. यानंतर रात्री दोन वाजता जरांगे यांनी पाटोद्यात सभेला मार्गदर्शन केले.
