Manoj Jarange Patil hunger strike: राज्यातील जात पडताळणी समित्या रद्द कराव्यात अशी नवी मागणी करत मनोज जरांगे यांनी आपले ११ उपोषण आंदोलन शनिवारी सुरू केली. जात पडताळण्या समित्या अन्य राज्यात नाहीत, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनीच दिली होती. या समित्यांची महाराष्ट्रात गरज काय, असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित करत, जर प्रमाणपत्राबाबतच्या मागण्या अंतरवली सराटीमध्ये मान्य झाल्या नाही तर मुंबईकडे आंदोलन कूच करेल, असा इशारा राज्य सरकारला दिला.

सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या मराठा मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केले आहे तसेच हैदराबाद गॅझेटिअरच्या निकषानुसार अर्ज केले असतील तसेच अर्ज करुन प्रमाणपत्र न मिळालेल्यांनी व वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्यांनी यावे. वैधता कशी मिळत नाही, हे मी पाहतो, असे सांगत मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली. आंदोलन मुंबईत करण्याचे ठरले तर जायचे का असे विचारले आणि मुंबईकडे जाण्याचा कल वाढता आहे का, याची चाचपणी केली. वर्षा बंगल्यावर जाण्याबाबतचा प्रतिसाद वाढता रहावा, असे सूचक वक्तव्य जरांगे यांनी केले.

मराठा समाजातील प्रत्येक प्रश्न आता सोडविण्यासाठी हाती घेतला आहे. सर्व स्तरातील मराठा या आंदोलनात येतील, असा प्रयत्न केला आहे. सर्व प्रश्न मार्गी लागावेत असे प्रयत्न करु, जर प्रश्न अंतरवली सराटीमध्ये सुटले नाहीत तर मुंबईत जाऊ. वर्षा बंगल्यावर जाऊ किंवा आझाद मैदानावरही जाऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा आंदोलकांच्या मागण्यासाठी येथेही वेळ देऊ पण मागण्या मान्य न केल्यास मुंबईत जाऊ. ‘ मुंबई ’ करांनी आम्हाला सहन करावे, आम्हीही तुमचेच आहोत, असे आवाहन जरांगे यांनी केले. मुंबईत कधी येणार याची माहिती देऊ. मग काही बाबी सहन करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

आपला गावातील एखादा नेता आंदोलनाकडे आला नाही तर त्याचे नाव सांगा, स्थानिक स्वराज संस्थांतील सर्व आजी माजी नेते आले नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये त्याचा वचपा काढू , असा इशाराही जरांगे यांनी दिला. मराठा मोठा व्हावा म्हणून हे आंदोलन आखले असल्याचे जरांगे म्हणाले. गावात तर भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दूरध्वनी केले तर कोण विरोधक हे कळेल असेही जरांगे म्हणाले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे जाण्याचा इशारा देत जरांगे यांनी संजय शिरसाठ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तिरकसपणे टीका केली. आंदोलना दरम्यान कसे वागावे, काय करू नये याच्या सूचनाही जरांगे यांनी दिल्या.