छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करून प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारच्या शिष्टमंडळाने दुर्लक्ष करण्याचे संकेत दिल्यानंतर, जरांगे समर्थकांसह मुंबईला जाण्याची तयारी करत आहेत. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता या अनुषंगाने समर्थकांची बैठक होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनास परवानगी मागितली असून सरकार ती देईल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’, अशी टीका करत जरांगे यांनी आंदोलकांची पावले मुंबईच्या दिशेने असल्याचे स्पष्ट केले.
एका बाजूला आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय होत असतानाच कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनीही जरांगे यांची भेट घेऊन त्यांची तब्येत लक्षात घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. पण त्याच वेळी जरांगे यांना सरकारने हात लावू नये, असा इशाराही दिला. जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून पाठिंबा वाढत असून लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी परिसरातील लातूर-बार्शी मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंगा तालुक्यातील निटूर येथे लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एका बाजूला आंदोलनाला पाठिंबा देणारी मंडळी रस्त्यावर येत असताना, सरकारकडून कोणत्या जिल्ह्यातून किती प्रमाणपत्रे दिली गेली, याचा गोषवारा देण्यास सुरुवात केली आहे.
‘आम्ही कायद्याला धरून अर्ज केला तर परवानगी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. गृहमंत्रालयाने परवानगी दिली पाहिजे. सरकारने सुद्धा नियम पाळले पाहिजेत. पण सरकार स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजत आहे. न्यायालयापेक्षा मोठे समजत आहे. संविधानाचे उल्लंघन करत आहे. परवानगी सुद्धा सरकार देईल आणि उपोषण सुद्धा आझाद मैदानावर होईल’, असे जरांगे पाटील यांनी शुक्रवारी म्हटले. आंतरवली सराटीमध्ये कोणी वाहने आणू नका, लांबच्या मंडळींनी रात्री यावे तर जवळच्या व्यक्तींनी सकाळी यावे, अशा सूचनाही जरांगे यांनी दिल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील १५ मागण्यांच्या बाबत तपशीलाने विचार केला, तर यातील १२ मागण्या पूर्ण झाल्याचे दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच शासनाने चर्चेची सर्व दारे खुली ठेवलेली आहेत.
कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व करताना त्या आंदोलनाची यशस्वी किंवा अपयशी बाजू सांगणे गरजेचे असते. त्यामुळे जरांगे यांनी प्रत्येक मागणीचा तपशीलाने विचार करावा आणि मगच काय तो निर्णय घ्यावा, असा सल्ला ज्योती मेटे यांनी दिला आहे. ‘युद्धात कमावलं आणि तहात गमावलं’ असं व्हायला नको, असे मत त्यांनी व्यक्त केले.
