छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ‘ ओबीसी’ मधून आरक्षण मिळावे म्हणून जरांगे यांनी आतापर्यत आठ उपोषण आंदोलने केली. शेवटच्या आंदोलना वेळी न्यायालयाने फटकारल्यानंतर जरांगे यांनी ‘ विजयोत्सव’ करत मुंबईतून परतणे पसंत केले होते. या आंदोलनामुळे मराठवाड्यातील राजकारणावर मोठा परिणाम पहावयास मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत सत्ताविरोधी लाट तयार करत जरांगे यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित अशी मतपेढी एकत्रित करुन दिली होती. आता पुन्हा आरक्षण प्रश्नावरुन त्यांनी सरकार विरोधी सूर आळवला आहे.
दरम्यान जरांगे यांनी कधी आणि कोणती आंदोलने केली. त्याचा तपशील असा :
२९ ऑगस्ट २०२३ – मराठा आरक्षण मागणीचे पहिले उपोषण
- १ सप्टेंबर २०२३ – जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेते,संघटना यांनी मनोज जरांगे यांना भेटी दिल्या. यात पहली व्यक्ती शरद पवार ही होती.
- १४ सप्टेंबर २०२३ – मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिलं उपोषण सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन स्थगित केले.
उपोषण दुसरे
- २५ऑक्टोबर २०२३ – सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे पुन्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले.
- ३० ऑक्टोबर २०२३ – माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली,
- ०२ नोव्हेंबर २०२३ – न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे,उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यतची मुदत देऊन उपोषण स्थगित केले
जरांगेंचा मुंबई मार्च
- २० जानेवारी २०२४ – मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे गेले
- २६ जानेवारी २०२४ – मुख्यमंत्रांनी सगेसोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगें पुन्हा अंतरवाली पोहोचले.
उपोषण तिसरे
- १० फेब्रुवारी २०२४ – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले.
- २० फेब्रुवारी २०२४ – विधानसभेचे विशेष अधिवेशनात मराठ्यांना १० टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झाले.
- २५ फेब्रुवारी – उपोषणा दरम्यान मनोज जरांगे मुंबईतील सागर बंगल्यावर निघाले.जरांगेंना पोलिसांनी भांबेरी गावात रोखले.
- २६ फेब्रुवारी – १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडले.
उपोषण चौथे
- ८ जून २०२४ : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.
- १३ जुन २०२४ राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी १३ जुलै पर्यत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी चौथ आमरण उपोषण स्थगित केलं.
उपोषण पाचवे
- २० जुलै : सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह राज्यातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे या मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले.
- २४ जुलै : गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडलं
उपोषण सहावे
- १७ सप्टेंबर २०२४ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले
- २५ सप्टेंबर : गावातील महिलांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडलं
उपोषण सातवे
२५ जानेवारी २०२५ आमरण उपोषणाला बसले
३० जानेवारी रोजी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उपोषण सोडले.
उपोषण आठवे
२७ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईकडे प्रस्थान २९ ऑगस्ट रोजी उपोषणास सुरुवात. ५ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअरला बाबतचा शासन निर्णय काढला. यावेळी उपोषण सोडण्यासाठी आलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. शिवेंद्रराजे भोसले. उदय सामंत यांची उपस्थिती हाेती. एका बाजूला न्यायालयाने फटकारले, पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आणि जरांगे यांनी विजयोत्सव जाहीर केला. गुलाल उधळून ते मुंबईतून परतले.
