बीड : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला झाल्या तर धनंजय मुंडे गोरगरीबांना अधिक त्रास देतील, असे विधान करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा वारसा चालवत आहेत तर धनंजय जातीपातीचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर एका मुंडेला चढवा आणि दुसऱ्याला उतवा, अशी रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला.

हत्या प्रकरणातील छायाचित्रे समाज माध्यमांवर पसरल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. या प्रकरणापासून प्रत्येक वेळी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टोकदार आणि तिखट शब्दांचा मारा होत आहे. या वेळी जरांगे यांनी पंकजा मुंडेंबाबत काहीसी मवाळ भूमिका मांडली.
जरांगे यांनी मुंडे भावंडांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी भाष्य केले. मंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणातून निवृत्त व्हावे वाटते असे विधान केले होते. यावर जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

या दोन्ही भावंडांच्या भूमिकेवर मत मांडताना मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांसह सर्वच समाजाने माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांना मोठे केले, पण धनंजय मुंडे यांनी मात्र समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. आता धनंजय मुंडेंनी मराठा समाजाच्या नादी लागू नये, असे जरांगे म्हणाले. पंकजा मुंडे राजकारणातून बाहेर पडल्या तर धनंजय मुंडे हे गोरगरिबांना त्रास देतील आणि त्यांना जेलमध्ये टाकतील. त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजकारणातून अजिबात बाजूला जाऊ नये, असे जरांगे म्हणाले.

माझ्या घातपाताचा कट

माझ्या खुनाच्या आणि घातपाताच्या कटात शंभर टक्के धनंजय मुंडे यांचा हात आहे, ती सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षित आहे आणि ती माहिती कधीही बाहेर येऊ शकते. हे मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे, असेही जरांगे म्हणाले.