जालना : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याच्या मुद्यावर येत्या जूनपासून उपोषणास बसण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. आवश्यकता भासली तर आपली मागणी पूर्ण होण्यासाठी मराठा समाज मुंबईला जाईल, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.
‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेझिटियर संदर्भात शासन निर्णय काढला आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी होते. या निर्णयानुसार अर्ज आणि स्थानिक चौकशी अहवाल येऊनही कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, जात पडताळणी प्रमाणपत्रेही दिली जात नाहीत. हैदराबाद गॅझेटिअर संदर्भातील शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढावे, असेही जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीव्या अनुषंगाने जरांगे म्हणाले, विखे यांच्यावर मराठा समाजाने विश्वास दाखविलेला असून त्यांनी तो सार्थ ठरवावा. त्यांनी या विश्वासाने रुपांतर गैरविश्वासात होऊ देऊ नये. प्रमाणपत्रे मिळण्याच्या संदर्भातील मागणीसाठी आता येत्या जूनपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर उपोषणास बसलो तर एकाही मंत्र्यांचे आपण ऐकणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
हैदराबाद गॅझिटियर अनुसार मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्रे देव्यात यावीत, शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरु करावे, मराठा आरक्षण आंदोलनात बळी पडलेल्यांच्या वारसांना महावितरण आणि औद्योगिक विकास महामंडळात नोकरी देण्याच्या संदर्भातील आदेश काढावेत, मराठा आरक्षण आंदोलनातील दाखल गुन्हे परत घ्यावेत, सारथी शिष्यवृत्ती वितरण करावे,मराठा आरक्षण अनुषंगाने सातारा गॅझिटियस्च्या संदर्भात शासन निर्णय कधी काढणार हे राधाकृष्ण विखे यांनी जाहीर करावे इत्यादी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या. मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी स्वत:ची प्रतिमा मलीन होऊ देऊ नये. हातचे राखून काम केले तर मराठा समाजात आपली काम केले तर ते अडचणीत येतील असा इशाराही जरांगे यांनी दिला.

