Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike: भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे काम गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु करणार असल्याचे आमदार लाड यांनी स्पष्ट केले. तसेच, पहिले कुणबी प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटील यांच्या हातातून देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगत उपोषण सोडण्याची विनंती लाड यांनी केली. पण, मनोज जरांगे पाटील सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार जीआर काढण्याची मागणी केली. तसेच, आमदार लाड यांच्या हस्ते पाणी पिऊन देखील उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

जरांगे पाटील काय म्हणाले?

प्रसाद लाड यांनी उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर देखील जरांगे पाटील यांनी उपोषण सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. “पाणी पितो, सलाईन लावतो पण उपोषण सोडणार नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले. सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार जीआर काढण्याची मागणी करत जरांगे पाटलांनी यासाठी चार दिवसांची मुदत दिली आहे. “चार दिवसांची वेळ देऊन पाणी पिणे व सलाईन लावणे सुरू राहील, पण उपोषण पूर्णपणे सुटणार नाही आणि प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

ओबीसींचे एका टक्का आरक्षण नको, असेही जरांगे पाटील म्हणाले. ज्यांच्या नोंदी निघत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, याला ओबीसींचा देखील विरोध नसला पाहिजे. सातारा, कोल्हापूर गझेटियरनुसार सरकारने तात्काळ जीआर काढावा आणि तीन महिन्यांनंतर त्याची अंमलबजावणी करावी. चार रद्द झालेले प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असेही पाटील म्हणाले.

प्रसाद लाड काय म्हणाले?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. आज भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची उपोषणस्थळी भेट घेत, जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगितले. १७ सप्टेंबरपूर्वी मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन आमदार लाड यांनी दिले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आलेल्या लाड यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. हैदराबाद गॅझेटचा निकाल पुढील ९० दिवसांमध्ये लागेल असे आश्वासनही त्यांनी दिले.