छत्रपती संभाजीनगर – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांची जयंती तथा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ऊर्दू भाषांच्या शाळांमध्ये मराठीचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम शुक्रवार घेण्यात आले. शहरातील मिसारवाडी भागात असलेल्या रशिरा बेगम ऊर्दू हायस्कूलमध्ये शुक्रवारी ‘कुसुमाग्रज मोहल्ला बालवाचनालय’ सुरू करण्यात आले. शाळेमध्ये मराठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यात बालभारतीचे ‘किशोर’ मासिक, कलीम अहमद कादरी लिखित ‘माझी मराठी’ या पुस्तकासह विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना टपालपत्राचे वाटप करून मराठी कविता, गीतांचे गायन झाले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
मिसरवाडी येथील कुसुमाग्रज मोहल्ला बालवाचनालय, मिलेनियम इंग्लिश स्कूल व रशिदा बेगम देशमुख उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी औपचारिकता म्हणून नव्हे, तर मुलांमध्ये प्रत्यक्ष वाचनसंस्कृती रुजावी यासाठी यावेळी विशेष साहित्याचे वाटप करण्यात आले. कलीम अहमद कादरी लिखित ‘माझी मराठी’ हे पुस्तक ऊर्दूतील मुलांना सुलभतेने भाषा उपयुक्त ठरणार असून, पत्रलेखनाची कला आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोस्ट कार्डचेही वाटप करण्यात आले, असे मुलांसाठी राबवण्यात येत असलेल्या वाचन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा रीड ॲण्ड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम बेग यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीचे संस्थापक अब्दुल मुकीम देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून मरयम मिर्झा बालवाचनालय अभियानचे संचालक मिर्झा अब्दुल कय्युम बेग आणि सोसायटीचे सचिव अमान देशमुख उपस्थित होते. अब्दुल मुकीम देशमुख यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, कुसुमाग्रज यांनी कवितेसह नाट्यलेखनाचाही प्रांत हाताळला. त्यांचे नटसम्राट हे नाटक रंगभूमीला लाभलेली अमीट कलाकृती असून, कुसुमाग्रजांची सामाजिक जाणीवही किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले आहे.
शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा सोहळा रंगला. भाषेच्या भिंती ओलांडून ज्ञानाचा प्रवास, असे या कार्यक्रमाला संबोधून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यात आले. मराठीतील कविता, गाणे गाण्यात आली.
दाक्षिणात्य राज्यांमध्ये तेथील सर्वच समाजघटक हे त्यांच्याच भाषेचा वापर करतात. शहरातही आम्ही मागील काही वर्षांपासून मराठी भाषा बोलण्यासाठी आग्रही असून, आतापर्यंत चार ऊर्दू शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे. – मिर्झा अब्दुल कय्यूम बेग.
