परभणी: राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी वेगवेगळ्या अटी, शर्ती लादुन करण्यात आलेली ही कर्जमाफी फसवी आहे असा आरोप सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी केला. शासनाच्या घोषणेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाढवाला शाल, टोपी व हार घालुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. यावेळी शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
सोनपेठ येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्य शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफीचा अध्यादेशाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर होळी करुन व गाढवाचा शाल श्रीफळ टोपी व हार घालुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. राज्य शासनाने काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधाने एक अध्यादेश काढला.
या अध्यादेशात नेहमीप्रमाणे अटी शर्थी घालुन लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजने बाहेर ठेवले त्यामुळे राज्यातील मोजक्या शेतकऱ्यांना या योजनेचा अल्प लाभ मिळणार असून बहुतांश शेतकरी या कर्जमाफीच्या निर्णयापासून वंचित राहणार आहेत असा आरोप तरुणांनी केला. तरुण शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.३) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी केली तर फसवी कर्ज माफी केल्या बद्दल गाढवाला शाल, श्रीफळ टोपी व हार घालुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला .
यावेळी भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील , विश्वंभर गोरवे, ॠषीकेश जोगदंड , कॉंग्रेसचे सैफुल्ला सौदागर, राजेश जोगदंड,किरण सोळंके, मंगेश जोगदंड, राहुल रोडे, नारायण फफाळ, चंद्रकांत नाईकनवरे ,माधव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
