नांदेड : पुढील वर्षातील १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी ठिकठिकाणी भरविण्यात येणारी ९९ संमेलने वादाची ‘नांदी’ ठरत असताना, साहित्य महामंडळातील संभाव्य वादावर राज्याच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी येथे कानावर हात ठेवले. मंत्री सामंत यांनी आपल्या बुधवारच्या नांदेड दौर्यातील पक्षाचा मेळावा तसेच काही शासकीय बैठका घेतल्यांनतर सायंकाळच्या सत्रात शहरातील लेखक-कवी, प्रकाशक तसेच साहित्यप्रेमींशी संवाद साधला.
नांदेडमधील त्यांच्या या पहिल्यावहिल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला. श्रीकांत देशमुख, डॉ.सुरेश सावंत या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांसह गतवर्षी याच पुरस्कारापर्यंत धडक मारणारे कवी देविदास फुलारी, प्रा.दत्ता भगत आणि अनेक जुने-नवे साहित्यिक त्यात सहभागी झाले होते.
वरील बैठकीदरम्यान मंत्री सामंत यांना अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीवर असलेल्या देविदास फुलारी यांनी एक निवेदन सादर केले. नियोजित ‘नांदी संमेलने’ महामंडळाच्या घटक संस्थांच्या माध्यमांतून होणे अपेक्षित आहे.
त्यास शासन अनुदान देणार आहे; पण महामंडळाशी संबंधित नसलेल्यांनी नांदी संमेलनांचे वेळापत्रक जाहीर करून टाकले आहे, याकडे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले; पण ह्या विषयात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे त्यांनी बैठकीचा समारोप करताना स्पष्ट केले. शंभरावे अ.भा.मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरविण्याचे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी ऑगस्टपासून पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ठिकठिकाणी भरविण्यात येणार्या ९९ नांदी संमेलनांचा आराखडा पुण्यातूनच जाहीर झाला.
महामंडळाचा कारभार सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असून ही संस्था आगामी संमेलनांची निमंत्रक संस्था आहे. नांदी संमेलनांबद्दल निमंत्रक संस्थेने महामंडळाच्या अन्य तीन घटक संस्थांना कुठलीही माहिती कळविलेली नाही. त्यामुळे ह्या तीन घटक संस्थांना अंधारात ठेवण्यात आल्याची भावना या संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये निर्माण झाली असून नांदी संमेलनांचा आराखडा पुणे मसापशी संबंधित एका व्यक्तीने परस्पर जाहीर केल्यामुळे पुढील काळातील वादाची ठिणगी आताच पडली आहे. त्यावरून समाजमाध्यमांमध्ये उलटसूलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साहित्य परिषदेने आपल्या कार्यकारिणीच्या येत्या रविवारी (दि.९) होणार्या बैठकीसमोर नांदी संमेलनांच्या वादग्रस्त आराखड्याच्या अनुषंगाने विचारविनिमय करून निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले. या विषयासाठी परिषदेला पुरवणी विषय पत्रिका जारी करावी लागली. विदर्भ साहित्य संघाने महामंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र पाठविले असल्याचे समजले; पण त्यास दुजोरा मिळाला नाही
पहिले नांदी संमेलन पुण्यात?
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या शीर्षपत्राखाली ९९ नांदी संमेलनांचा आराखडा जाहीर झाला आहे. त्याबद्दल अन्य तीन घटक संस्थांना कुठलीही माहिती अधिकृतपणे नसताना या मालिकेतील पहिले संमेलन पुण्यात १४ ऑगस्ट रोजी दर्शविण्यात आले आहे, तर सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाणे, डोंबिवली, पनवेलसह अन्य राज्यांत सहा ठिकाणी संमेलने होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
