छत्रपती संभाजीनगर : शहरापासून साधारण २०-२२ किमी अंतरावरील अडीच-तीन हजार लोकवस्तीच्या ‘गणोरी’तील सविता उबाळे यांची दोन्ही मुले गावच्याच इंग्रजी शाळेत शिकतात. अवघ्या दीड एकर शेतीवरच पोट असलेल्या सविता आणि त्यांचे पती भाऊसाहेब हे मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी प्रसंगी इतरांच्या शेतात मजुरी करतात, तर निर्मला पांचाळ नातीचा शैक्षणिक खर्च पेलण्यासाठी एका कारखान्यात काम करतात. गावगावातील पालक मुलांनी इंग्रजी शिकावं-बोलावं म्हणून अक्षरश: कष्ट उपसताहेत.
धड रस्तेही नीट नसलेल्या गावांमध्येही ‘स्कूल बस’ धावताना दिसते आहे. जिल्हा परिषद शाळांना सुसज्ज इमारतीपासून अत्याधुनिक प्रयोगशाळेपर्यंतची व्यवस्था असली तरी ‘मराठी’ शाळा म्हणून विद्यार्थी संख्या कमी होतानाचे चित्र आहे. राज्यभर हे चित्र कायम आहे.
मराठी शाळांवरून बरेच काही ऐकवले-बोलले जात असले किंवा कोटींचा निधी देण्यात येत असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांमध्ये मुलांची नावे दाखल करण्याकडचा कल वाढताना दिसतो आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा तशा सेमी इंग्लिश. परंतु, जाहिरात त्याची ‘इंग्रजी शाळा’ म्हणूनच. शाळा व्यवस्थापनाने छानसा ‘टाय-बेल्ट’, ‘सॉक्स-शूज’चा निवडलेला आकर्षक रंग-संगतीतील पोशाख. शिक्षक-शिक्षिकांसाठीही शहरी बाण्याचा गळ्यात शाळेच्या नावाची ओळख-पट्टी असलेला पेहराव.
स्कूल बसमधून मुलांसोबत शिक्षकांचा दारोदारपर्यंतचा नित्य प्रवास. पालकांना मुले स्कूलबसमधून शाळेला जातात आणि येतात याचे कोण अप्रुप. त्यामागे शाळेकडूनच ने-आण करण्याचा भार वाहिला जात असल्याने कामावर असताना चिंता वाटत नाही आणि वैयक्तिक पातळीवरही अभ्यासाकडे लक्ष दिले जाते, अशीच पालकांची भावना.
गावातील एक पालक अण्णासाहेब तांदळे यांना एक एकरच शेती. पण त्यांची मुलेही इंग्रजी शाळेत. तांदळे सांगतात की, आपल्याला इंग्रजी शिकता आले नाही म्हणून मुलांना इंग्रजी शाळेत दाखल केले. येथे मुलांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष दिले जाते. सरकारी किंवा अनेक अनुदानित शाळांमधील शिक्षणाबाबतही तक्रार नाही, पण त्यांच्या शिक्षकांना शासनाची किंवा संबंधित संस्थाचालकांची निवडणूक अथवा अन्य रिकामी कामे दिलेली असतात. परिणामी मुलांकडे दुर्लक्ष होते.
जि. प. शाळांचे पूर्वीसारखे चित्र आता राहिलेले नाही. सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांकडून विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग केले जातात. ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा उघडू लागल्याने पालक हौसेखातर मुलांना तेथे शिकवतात, परंतु खर्चाचा भार पेलवत नसल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषद शाळांकडे धाव घेतात. – अनिल देशमुख</strong>, मुख्याध्यापक, गणोरी, पीएम-श्री जि. प. शाळा.
जिल्ह्यात मेसा संघटनेशी संलग्नित ६०० ते ७०० इंग्रजी, सेमी इंग्लिश किंवा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळा आहेत. विद्यार्थी संख्या ६० ते ७० हजार. पाच ते सात हजार शिक्षकवर्ग आहे. यातील ३० ते ३५ हजार विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शाळांमध्ये आहेत. बहुतांश विद्यार्थी वर्ग हा शेतकरी किंवा शेतीत काम करणार्या वर्गातील आहेत. – अक्षय न्यायाधीश, शाळा संचालक तथा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन.
