scorecardresearch

संसदेच्या नव्या इमारतीला मराठी शिल्पकाराचा कलासाज; राजमुद्रा उभारणीसाठी औरंगाबादच्या कलावंताची निवड

दिल्ली येथे ६४ हजार ५०० चौरस मीटरवर संसदेची नवी इमारत होत आहे.

|| सुहास सरदेशमुख

राजमुद्रा उभारणीसाठी औरंगाबादच्या कलावंताची निवड

औरंगाबाद : दिल्लीत नव्याने होणाऱ्या संसदेच्या इमारतीमधील भव्य अशोकस्तंभावरील ‘राजमुद्रा’ घडविण्याचे काम औरंगाबाद येथील प्रथितयश शिल्पकार सुनील देवरे यांच्याकडून करण्यात येणार आहे.

टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने या कामासाठी देवरे यांची निवड केली असून गेल्या चार महिन्यापासून ते या कामासाठी आवश्यक तो तपशील बारकाईने अभ्यासत आहेत. रतन टाटा यांनीही देवरे यांच्या निवडीबाबत पसंती व्यक्त केली आहे.

वेरुळ व अजिंठा येथील अभ्यागत कक्षातील मूर्तिकाम करणाऱ्या सुनील देवरे यांचा शोध टाटा प्रोजेक्टकडून घेण्यात आला.  ‘देशाच्या संसदेवर उभ्या होणाऱ्या राजमुद्रेला आपला हात लागतो आहे, याचा अभिमान वाटतो,’ असे कलाकार सुनील देवरे यांनी  सांगितले.

दिल्ली येथे ६४ हजार ५०० चौरस मीटरवर संसदेची नवी इमारत होत आहे. त्याचा खर्चही अलीकडेच ९७७ कोटी वरून १२५० कोटींपर्यंत वाढेल असे सांगण्यात येत आहे. ४० टक्क्यांहून अधिक काम आता पूर्ण होत आले असल्याने पहिल्या टप्प्यातील कामात अशोकस्तंभाची मुद्रा उभारण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.

चार महिन्यांत… संसदेच्या नव्या इमारतीवर २१ फूट उंचीची तांब्याच्या धातूतील मुद्रा बसविण्यात येणार आहे. पायासह ही उंची ३० फूट असणार आहे. त्याचे मातीशी संबंधित कामही आता पूर्ण झाले आहे. एप्रिल- मे मध्ये ते पूर्णत्वास येईल.

थोडा इतिहास…

मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक सम्राट अशोक यांनी अशोकस्तंभ तयार केला. यावर चार सिंह मूर्ती आहेत. छायाचित्रात त्या तीनच दिसतात. वरच्या बाजूला सिंह म्हणजे शक्ती व धैर्याचे प्रतीक मानले जाते. या खाली घोड्याचे चित्र असून तो गती व उर्जेचे प्रतीक आहे. बैल हे कष्ट व परिश्रमाचे, तर हत्ती हे अफाट सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. २४ आरे असणारे अशोक चक्र हे त्याचे वैशिष्ट्य. उत्तर प्रदेशातील सारसनाथ येथील स्तंभांच्या आधारे भारताची राजमुद्रा घेतली आहे.

देवरेंचा कलापसारा…

’देवरे यांचे १९९६ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली. १९९८ साली संत ज्ञानेश्वरांची संगमरवरी मूर्ती केली. त्यानंतर त्यांच्या जीवनावरील शिल्पसृष्टी तयार केली.

’अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चौंडी येथे शिल्पसाखळी उभारली, तसेच वाटेगाव येथे अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट सांगणारी शिल्पे उभारली.

’महात्मा गांधी, अनंत कान्हेरे यांचेही पुतळे बनविले. सावित्रीबाईंच्या जीवनावर २० पुतळे सातारा जिल्ह्यात बनविले आहेत.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi sculptor work new building parliament selection artist aurangabad erection of rajmudra akp