छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी अतिवृष्टीने घरात सगळा चिखल झाला. अगदी मुलांची पुस्तके भिजली. पावसाने डोळ्यात पाणी आणले. गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मनीषा गटकळ यांचे आयुष्य पावसामुळे पार वाहून गेले. तेच गटकळ कुटुंबीय आता पावसाच्या न येण्याने व्याकुळ झाले आहे. शिवारातील पिके माना टाकू लागली आहेत. पीक आलेच नाही तर, या शंकेने सारा मराठवाडा हैराण आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळसदृश स्थिती यामुळे मराठवाड्यातील हवामान बदलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या बारा वर्षांत तीन वर्षे तीव्र दुष्काळाची तर सहा वर्षे अतिवृष्टीची होती.

मराठवाड्यात १ हजार २५५ पूरप्रवण गावे शिवाय १३७० नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरते. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यात झालेल्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार उडाला होता. १५५ व्यक्ती पावसामुळे मृत्युमुखी पडल्या होत्या. वीज पडून ४६ तर ९३ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. तब्बल ४ हजार ४९८ जनावरे वाहून गेली होती. अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली होती. आजही नांदेड जिल्ह्यातील मुखेड भागात त्या खुणा कायम आहेत. याच भागातील वानेगाव शिवारातील शेतकरी पांडुरंग विठ्ठल राजुरे म्हणाले, ‘या वर्षी खूप कष्टाने शेतीतील वाहून गेलेली माती दुरुस्त करून तीन एकरातील थोड्याशा भागात सोयाबनी, तूर आणि मूग लावले होते. २४-२५ जून रोजी पाऊस आला होता. पुन्हा उघडीप झाली. आता पावसाने पाठ फिरवली आहे. पिके माना टाकत आहेत. हातचे सारे जाईल, अशी भीती सतावते आहे. निसर्गच बदलला आहे.’

अशीच परिस्थिती पूर्णत: बदलेली आहे. तेव्हा अधिकच्या पावसाने मारले होते. आता पाऊस न आल्याने चिंता वाढली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी अण्णासाहेब जगताप सांगत होते, ‘गेल्यावर्षी वीस गुंठे जमीन वाहून गेली होती. वाहून गेलेल्या जमिनीची डागडुजी केली. आता या जागेत कापूस लावला आहे. पण तो किती दिवस टिकेल माहीत नाही. आता पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागते की काय, असे वाटते आहे.’ अतिवृष्टीने बाधित या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही. आता दुष्काळाच्या तोंडावर उभे आहोत काय, या चिंतेत शेतकरी आहेत. मराठवाड्यातील सारे वातावरण कोरडे आहेत. मान्सूनचे ढग नसल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लातूरच्या मांजरा पट्ट्यातील गोपाळ तावडे सध्या लातूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये हमाली काम करतात. मालमोटारीतून फरशी उचलण्याच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. त्यांचा एक मुलगा इंजिनिअर झाला आहे. त्याला नोकरी नाही. दुसरा मुलगा बीएएमएस शिकतो आहे. त्याच्या शिक्षणासाठी झटणारे तावडे सांगत होते, ‘ गेल्या वर्षी शेतात उभे राहणेही शक्य नव्हते. चोहीबाजूने पाणी होते. नजरेच्या टप्प्यात फक्त वाळूच वाळू. कारण मांजरा नदीने पात्र बदलले होते. ४०० एकर शेती जलमय झाली हाेती. ७० एकरांवर वाळूचा जाड थर आला होता. पण ती वाळू हटवून पुन्हा जमीन तयार केली. पुन्हा पेरणी केली. आता दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. उगवलेले पीक करपायला लागले आहे.’

गोपाळ तावडेंसारखी सर्वांचीच अवस्था आहे. गेल्या वर्षी पावसाने मारले आणि या वर्षी आवर्षणाच्या भीतीने सारे हैराण आहेत. मराठवाड्याची मोठी समस्या हवामान बदल आहे. पण त्यावर ना योजनांची आखणी ना उपाययोजना. या काळात दुष्काळात सर्वाधिक ४ हजार १५ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आजही टँकर कायम आहेत. अतिवृष्टीत नद्यांनी अगदी पात्रही बदलली होती. आता हवामान बदलाच्या आधारे नवी रणनीती आखा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हवामान बदलाची स्थिती सांगणारी पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये : (कंसातील आकडे शेकडा प्रमाणाचे )

२०१४ – ४१४.०३ (५३ ) , २०१५ – ४३३.६४ ( ५६ ) , २०१६ – ८७९ (११३ ), २०१७ – ६७३ ( ८६ ) , २०१८ -५०१ ( ६४ ), २०१९ – ७७० (९९ ), २०२० – ९५१ ( १२७ ), २०२१ – ९५१ ( १४६), २०२२ – ९१४ (१२२ )., २०२३ – ५८९.८ (७९ ), २०२४ – ८८५.४० (११८ ), २०२५ – ७५१ (१३८ )

मराठवाड्यातील पावसाची सरासरी २०१९ पर्यंत ७७९ एवढी होती. त्या पुढील वर्षापासून ती ७५१ एवढी झाली.