छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विकासाच्या प्रश्नी जाहीर केलेल्या योजनांचा निधी ४६ हजार ५७९ कोटी रुपये होता. यापैकी मिळाले फक्त तीन हजार कोटी. अनेक प्रकल्प कागदावरच आहेत. त्यामुळे मराठवाडा विकासाची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी (शिवेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार या शीर्षकाखाली मराठवाडा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सादरीकरण करण्यात आले. ही श्वेतपत्रिका काढलीच तर कोरा कागदच असेल अशी तिरकस टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
हे सादरीकरण म्हणजे दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलनाचा परिणाम म्हणायचा़ की राहुल गांधी यांच्या कार्यशैलीचा प्रभाव हे तुमचे तुम्ही ठरवा. पण दिल्लीतील आंदोलनामुळे शांत बसणारे अनेकजण आता बोलू लागले आहेत, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पक्षीय राजकारण सोडून शाश्वत विकासावर सरकारनेही चर्चा करावी़. पण होते असे की, ‘वंदे मातरम्’ चे किती कडवे गायिले जावेत यावर चर्चा घडवून आणली जात आहे, असे ठाकरे म्हणाले.
दिपके यांनी सुरू केलेल्या शाळा तपासणी मोहिमेचेही आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. अशा प्रकारे तपासणी करायला काय हरकत आहे. विकास प्रश्नावर काही प्रश्न, उणिवा दाखविण्यासाठी मराठवाड्यात ‘ विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार’ हे आंदोलन केले जाईल असेही ठाकरे म्हणाले.
प्रत्येक प्रकल्पाचा हिशेब द्यावा लागेल अशी मागणी करत मराठवाड्यातील विकासचे ७८० विषयांची यादी केली असून प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा प्रकल्प तरी पूर्ण होतील यासाठी आम्ही आग्रही राहू असे या वेळी आमदार अंबादास दानवे म्हणाले. मराठवाडा दुष्काळमुक्त मराठवाड्याची दिलेली आश्वासने, २०१६ जाहीर केलेला वॉटरग्रीड करू.
मराठवाड्याला सिंचन प्रकल्प अशी मोठी यादी सादर करत न झालेले सोयाबीन संशोधन केंद्र, मोसंबी बाजारपेठ हे प्रकल्प कधी हाती घेतले जातील असे प्रश्न विचारणारे आंदोलन सुरू करण्यात आल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमदार कैलास पाटील यांनी केले. तर सादीकरणाचा बहुतांश भाग आमदार अंबादास दानवे यांनी उचलला. आदित्य ठाकरे त्यांचे मुद्दे काही वेळा विस्तारत होते.
