छत्रपती संभाजीनगर : काहीही करू आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आपलेच सुपूत्र नेमू असे प्रारुप मराठवाड्यात विकसित होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी नातेवाईक नेमणुकीचे प्रारुप आखून दिले होते. तेच महायुतीमध्येही पद्धतशीरपणे जपले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरे यांचे पूत्र आमदार विलास यांची अलिकडेच अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले. धाराशिवमध्ये भाजपचे आमदार बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील अध्यक्ष आहेत. लातूरमध्ये ही जबाबदारी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचे बंधू माजी आमदार धीरज देशमुख सांभाळत आहेत. नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप झालेली नाही. जिल्हा बँकेवर अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व असल्याचे नुकतेच निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक होणे बाकी आहे. सहकारातील नातेवाईकांचा पॅटर्न परभणी व हिंगोली जिल्हा बँकेसाठीही लागू आहे. मंत्री मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या दोन जिल्हा बँका वगळता अन्य बँकाच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.
घोटाळे आणि तोटा
मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, बीड या जिल्हा बँकेतील घोटाळे आणि तोटा गाजले होते. मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी १०० कोटी रुपयांची मदत जिल्हा बँकेस केली होती. बीडमधील घोटाळ्यानंतर अलिकडे ही बँक कशीबशी तोट्यातून वर आली आहे.
