बीड :  परतीच्या मोसमी पावसानंतर आणि रब्बी हंगामाच्या शेवटी दिसणार्‍या अनेक वनस्पती मराठवाड्यात आता हिवाळ्यापूर्वीच दिसू लागल्या आहेत. जणू उन्हाळाच सुरू झाला आहे. या वनस्पती दुष्काळाची तीव्रता दर्शवत आहेत. त्याशिवाय पावसाअभावी धरणसाठे तळाला गेले असून मासे तडफडून मरून पडू लागले आहेत. पूर्वी गावातील तलावामध्ये दिसणार्‍या मरळ नावाच्या माशाची प्रजाती लुप्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील तापमान वाढत आहे. तसतसे गावोगावी करपलेल्या पिकांबरोबर बांधावर काटेरी वनस्पतींमध्ये मोठी वाढ दिसू लागली आहे. कुसळ, काटेरी गवत, करंज, भुई उंबर, चिबुक काटा, गोलाकार गोकुर ही कोटेरी वनस्पती, खैर, एरंड, मोगली येरड, गुगळ या वनस्पती शेताच्या बांधावर दिसू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा शिवारात गवळवाडी या गावी मांजरा नदीचा उगम होतो.

उगमाच्या स्थानापासून ते लातूर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवणारी मांजरा नदी आता पूर्णत: कोरडी पडली आहे. गावोगावचे लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प आटत चालले आहेत. दुष्काळाची स्थिती गंभीर होऊ लागली आहे. एका बाजूला हे सारे घडत असताना सर्वसाधारणपणे हिवाळ्यानंतर दिसणार्‍या वनस्पती आता दिसू लागल्या आहेत.

अगदी रस्त्याच्या कडेला रुचकी मोठी झाल्याचे दिसून येते. धोतरा किंवा बेशरम वाढते आहे. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वनस्पतिशास्त्र विषयाचे तज्ज्ञ प्रा. रवी पाटील म्हणाले, ‘येडी बाभूळ , खैर, थिवर, बोर अशा काटा असणार्‍या वनस्पतींचे काटे जसजसा उन्हाळा तीव्र होतो, तसतसे अधिक टोकदार आणि कडक होत जातात. ही प्रक्रिया आता खूप लवकर सुरू झाली आहे. यावर्षी अशा उन्हाळ्यात दिसणार्‍या वनस्पती वाढल्या आहेत. हे सारे एका दिवसात घडत नसते, पण हवामान बदलाचा मोठा परिणाम आता जाणवू लागला आहे.

जाड पाने असणार्‍या वनस्पती उन्हाळ्यापर्यंत टिकतात, वाढतात. या वर्षी अशा वनस्पतींची संख्या हिवाळ्यापूर्वी दिसू लागली आहे.’  पाटोदा तालुक्यासह मराठवाड्यात गोदावरीवगळून पाणी धरून ठेवण्याची अधिक क्षमता असणार्‍या काही वनस्पतींची पाने अजून हिरवी आहेत. बहुतांश भागात जिथे करपलेले पीक नाही, तिथे काटेरी गवत वाढू लागले आहे. या अनुषंगाने बोलताना प्रा. ज्ञानेश्वर देशमुख म्हणाले, ‘तलाव आटत असल्याने मासे मरत आहेत. मरळसारखा मासा तर पुढे मराठवाड्यात दिसेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे जलजीवन पूर्णत: मृतप्राय झाले आहे.’