छत्रपती संभाजीनगर : लातूर तालुक्यातील मळवटी नावाच्या गावात अजून गवतही उगवले नाही. पेरणी तर दूरच. लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत, ६० गावांत अजून जमिनीमध्ये बियाणेच टाकता आलेले नाही. ज्यांनी पेरणी केली नाही, तेच नफ्यात राहिले असे म्हणण्याइतपत स्थिती बिघडू लागली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत चाकूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ८१ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. लातूर, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील देवणी, औसा, सोनपेठ आणि लोहारा तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. या पुढे पाऊस झाला तरी न पेरलेले बरे, अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेश तीर्थपुरीकर यांनी या वृत्तास दुजाेरा दिला आहे. परिस्थिती गंभीर आहे.
मळवटी गावातील शेतकरी किशोर पाटील म्हणाले, ‘या वर्षी नांगरटीचा ढेकूळही फुटला नाही. या वर्षी एकदा पाऊस झाला. पण तो पेरणीयोग्य नव्हता. त्यामुळे या पुढे जनावरांना चारा तरी उपलब्ध होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’ लातूरपासून केवळ सहा किलोमीटरवर असणाऱ्या या गावात आता पिण्याच्या पाण्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. कासरखेडा, चिकठाणा या गावांतील स्थितीही अशीच वाईट आहे. लातूर विभागात ६० ते ७० गावांमध्ये पेरणीच करता आली नाही.
लातूर जिल्ह्यातील देवणी, औसा या तालुक्यांमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दुष्काळची तीव्रता वाढली आहे. तर लोहारा तालुक्यात जूनपासून १० वेळा पाऊस पडला खरा, पण तो रिमझिम होता. ज्यांनी पाऊस येईल, असे गृहीत धरून पेरणीचे धाडस केले त्यांची पिके आता कोमेजून गेली आहेत. हा सगळा पट्टा सोयाबीनचा. साधारणत: एक एकर सोयाबीन पेरणीसाठी बाजारभावानुसार २० ते २२ हजार रुपये लागतात. चुकून पिकले तर भाव मिळणार नाही, असे गृहीत धरून आता अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची आशा सोडून दिली आहे.
मराठवाड्यात ७४.४ टक्के पाऊस
-मराठवाड्यात सरासरीच्या ७४.४ टक्के पाऊस पडला असला तरी जिल्हानिहाय आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे. चाकूरमध्ये ८१, लोहार – ८३.९, सोनपेठ : ९०.५, औसा ९९.५ आणि देवणीमध्ये १००.२ मिलीमीटर एवढा कमी पाऊस झाला.
-जालना, बदनापूर, केज, किनवट आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे.
‘मांजराकाठी शेती आहे. गेल्यावर्षी पावसाने शेतीसह पीक वाहून गेले होते. या वर्षी घरात सोयाबीनचे बियाणे, खत आणून ठेवले आहे. रान अक्षरश: कोरडे आहे. कसं जगायचं असा प्रश्न आहे.’ – सोनेराव शिंदे , कासारखेडा, ता. लातूर
‘पेरणीच न झालेल्या काही गावांना भेटी दिल्या आहेत. पाऊसच नसल्याने पेरणी होऊ शकली नाही. अनेक गावांमध्ये मोठी समस्या आहे. ज्या गावांमध्ये पेरणी झाली आहे ती पिके अगदी चार दिवस जगतील, एवढीच त्यात दुगदुगी आहे. पाऊस नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. लातूर विभागात ६० गावांमध्ये पेरणी झाली नाही. महेश तीर्थपुरीकर, सहसंचालक, कृषी, लातूर विभाग
