छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळाचा पहिला निकष लागू झाला आहे. संभाजीनगर वगळता अन्य सर्व जिल्ह्यातील पिके करपून चालली आहेत. मोठा पाऊस नसल्याने धरण पातळीत वाढ झालेली नाही. या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. जर पिकांचे पंचनामे आता केले नाहीत, तर ऑक्टोबरमध्ये पंचनाम्यासाठी पीकच राहणार नाही. त्यामुळे तातडीने पंचनामे करून एकरी २० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्याची शिफारस राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातील अधिकाऱ्यांच्या समितीने महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

दुष्काळस्थितीबाबतची माहिती कळविण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

पाऊस सुरू झाल्यापासून सलग सप्टेंबरपर्यंत २७ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ निकषाच्या पहिल्या पायरीवर पोहोचला आहे. या जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५३ मंडळे बाधित असून, बऱ्याच गावांतील शेतकऱ्यांनी पिकांची आशा सोडून दिली आहे. जर पीक काढून टाकण्याची तयारी सुरू झाली, तर दुष्काळ घोषित करण्यासाठी पुरावाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पीक कापणी प्रयोग आणि पंचनामे तातडीने घ्यावेत आणि या पंचनाम्यात ३३ टक्के किंवा ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होत असेल, तर केंद्र शासनाकडे मदतीसाठी निधी मागावा, अशी शिफारस समितीने केली आहे.

नांगरणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत शेतकऱ्यांना एकरी १५०० रुपये खर्च येतो. परिणामी, आता पीक काढणेही शेतकऱ्यांना परवडणारे नाही. किमान २० हजार रुपये प्रतिएकर असे अनुदान शेतकऱ्याला मंजूर व्हावे आणि ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास १० हजार रुपये अनुदानाची शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली आहे.

राज्य आपत्ती निवारण दलामार्फत करण्यात आलेल्या या पाहणीमध्ये पिके पूर्णतः हाती येणार नाहीत. फुलोऱ्यातील सोयाबीन पीक करपून गेल्यामुळे त्याचे शेंगांमध्ये रूपांतर होणार नाही. काही भागांत सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला. परिणामी भूम, परांडा, वाशी, कळंब तालुक्यात परिस्थिती गंभीर आहे, असे निरीक्षण या समितीने नोंदवले आहे. आयआयटी, मुंबईमधील जललेखा प्रारूपाचा या निष्कर्षासाठी वापर करण्यात आला असून, हे प्रारूप पोखरा योजनेतही मंजूर आहे. धाराशिव जिल्ह्यातील ४२ व जिल्ह्याच्याजवळील २२ हवामान केंद्रांतून घेतलेल्या माहितीनुसार, तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड किंवा जून ते सप्टेंबरमधील पाऊस सरासरीच्या ७५ टक्के कमी असल्यास दुष्काळाची पहिली कळ लागू पडते.

जिल्ह्यात सर्वत्र गंभीर दुष्काळ दिसत असल्याचे निष्कर्ष समोर येत आहेत. वालवड, वाशी, तेरखेडा, येरमाळा अशा आठ महसूल मंडळांत मातीत दहा टक्क्यांपेक्षा कमी ओलावा असून, या मंडळांत ऑगस्टमधील पावसाची तूट २५ टक्के ते ९० टक्के इतकी आहे. भारी, मध्यम आणि हलकी अशा प्रकारच्या मातीवर ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असणारी २३ मंडळे असून, हलक्या मातीच्या २० मंडळांमध्ये नुकसान झाले आहे.

लातूरमधील स्थिती बिकट

पावसामुळे पिके सुकून चालली आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला आहे. तो पाऊसही अत्यंत विखुरलेला आहे. येत्या काळात पाऊस झाला तरी उत्पादनात वाढ होणार नाही. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. उसाचा उतारा कमी येईल. तसेच आडसाली लागवड तर होऊ शकली नाही. बीड, परभणी, नांदेड व अन्य जिल्हाधिकाऱ्यांनीही पीक परिस्थितीबाबतचे अहवाल राज्य सरकारला कळविले आहेत.