छत्रपती संभाजीनगर : पेरणींसाठी आवश्यक असणारा पैसा हाती नसल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जून महिन्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. जून महिन्यात मराठवाड्यात फक्त १३ दिवस पाऊस झाला. निलंग्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
अवेळी पावसाने पेरणी खोळंबली आहे. खासगी देणे आणि फायनान्सचे फेडणे शक्य नाही असे चिठ्ठीत लिहून ५३ वर्षाच्या मधुकर तुकाराम पाटणकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. निलंगा येथील गांधीनगर परिसरात राहत्या घरी गळफास घेऊन या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. केवळ लातूर नाही तर नांदेडमधील बागायत क्षेत्र असणाऱ्या अर्धापूरमध्येही शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.
जूनमधील कमी पाऊस आणि खोळंबलेल्या पेरण्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. घटनास्थळी मृत पाटणकरच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात कर्जबाजारीपणा आणि पेरणीसाठी पैसे नसल्याचे उल्लेख करण्यात आले आहेत. आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मधुकर पाटणकर यांनी , ‘माझी कोणाविषयी तक्रार नाही सततच्या अवेळी पावसाने पेरणी खोळंबल्याने माझी आर्थिक विवंचनेस कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत आहे तसेच व्यापारामध्ये आर्थिक नुकसान झाल्याने खाससगी देणे व फायनान्सचे कर्ज घेतले होते. वेळेवर परतफेड न करता आल्यामुळे निराश होऊन आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरण्यात येऊ नये, ’ असा मजकूर लिहिला आहे.
निलंगा तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा सावकारीचा फास यामुळे या आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते. निलंगा तालुक्यातील सोनखेड आणि जामगा या यावी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीवरील कर्जाचा वाढता बोजा आणि खासगी सावकारीच्या त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी केला आहे. सोनखेड येथील मारुती मनोहर सोळुंके (वय ३६) यांनी २५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला. उपचारादरम्यान २७ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. जामगा येथील पंडित रामा पवार (वय ४८) यांनी ३० जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनसरवाडा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत व्यंकटराव माने (वय ६५) यांनी कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून ३० जून रोजी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसात मुलगी, दोन मुलांचे मृत्यू आणि त्यांच्या उपचारासाठी झालेल्या खर्चामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. शेतीतील अपुरे उत्पन्न, बँक व सावकाराचे कर्ज आणि वाढता आर्थिक ताण यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विधवा सुना, तीन नातू व दोन नाती असा परिवार आहे.
