छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत विविध ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी वज्रमूठ केली. परभणी येथे रेखांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढून एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द असा संकल्प केला. लातूर येथेही शेतकऱ्यांच्या संकल्पित महामार्गाच्या विरोधात आंदोलन केले. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून या महामार्गास कडाडून विरोध असल्याचा संदेश मंगळवारी आंदोलनातून दिला.
‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’, अशी घोषणा देत परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कानेगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. पूर्णा तालुक्यातील सुरवाडी तसेच कानेगाव (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी संपादीत होणाऱ्या जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शवला. आपण कोणत्याही परिस्थितीत ही मोजणी करू नये. या मोजणीला आमचा विरोध आहे, अशी भूमिका यावेळी रामचंद्र पंडितराव मोकाशे, धनंजय चंद्रकांत मोकाशे, हेमंत चंद्रकांत मोकाशे, शंकर राठोड, महादेव डुकरे, किसनराव इखे यांनी मांडली.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील आंदोलनास नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हेही सहभागी झाले आहेत. लातूर येथेही शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. बीड आणि लातूरच्या सीमेवर बर्दापूर पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूर तालुक्यात ढोकी (येळी) येथे संयुक्त मोजणीस १५० हून अधिक पोलीस बंदोबस्तासह आलेल्या उपविभागीय अधिकारी राेहिणी नरे यांना शेतकऱ्यांनी गावातून परत पाठवले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी आता मराठवाड्यात आंदोलने सुरू झाली आहेत. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा व परळी तालुक्यातील तळेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.