छत्रपती संभाजीनगर : एखादी जमीन बिनशेती म्हणून नोंदली गेली आणि त्याचे भूखंड पडले की त्यावरी मालकी दर्शविणारा मालकीचा कागद सात- बारा भलामोठ्ठा होतो. म्हणजे एखाद्या एकरात ५० भूखंड पडले तर आणि ते ५० जणांनी विकत घेतले तर ५० जणांची नावे मालक म्हणून नोंदली जातात. परिणामी एकाला जरी मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर ५० जणांची नावे असणारा सात – बाराचा फॉर्म घ्यावा लागत असे. यातून सुटका व्हावी असा पहिला पहिला तीसगावमध्ये करण्यात आला. या गावातील एका भूखंडावरील ७० सातबारा फॉर्म शुक्रवारी स्वतंत्र करण्यात आले. अप्पर तहसलीलदार उमेश पाटील यांनी हे काम पुढाकार घेऊन पूर्ण करण्यात आले. तीसगाव या शहरातील भागात राजस्व अभियानाच्या निमित्ताने ही प्रक्रिया हाती घेण्यात आली.

हैदराबाद संस्थानाचा भाग असल्याने मराठवाड्यातील जमीन नोंदणीमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. एखाद्या शहराजवळील जमीन अकृषी म्हणून जाहीर झाल्यानंतर त्याचे भूखंड पडतात. हे भूखंड घेणाऱ्या मालकाची नोंद सात बारा या पत्रकावर घेतली जाते. यातील सात क्रमांकाची नोंद ही मालकी दर्शविणारी असते. तर १२ क्रमांकाची नोंद लावलेल्या पिकाची असते. शहरी भागात भूखंड पडल्यानंतर १२ क्रमांकाची नोंद रिक्त राहते. पण सातबारा हा फॉर्म मात्र एकच आहे. शहरी भागात एकाच भूखंडात अनेक मालक असल्याने त्याची नोंद घेण्यात चुका होऊ शकतात किंवा एखाद्याचा भूखंडच कागदोपत्री राहताे. या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून सातबारा सुटा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

शहरातील ३० गाव आणि गोलटगाव या भागातील सातबारे आता सुटे करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. तीसगावमधील ६८ मालकांचे सातबारे शुक्रवारी स्वतंत्र करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकाच्या मालकीचा स्वतंत्र एकच कागद या पुढे असणार आहे. ही मोहीत शक्य तेवढ्या सर्व गावांमध्ये करण्याचा मानस असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची महसूल रचना या पूर्वीच झाली आहे. मात्र, मराठवाड्यात सातबारा सुटा करण्याची प्रक्रिया झाली नव्हती. त्यास पहिल्यांदा गती देण्यात आली आहे.

जमीनबाबतचे किती नमुने

सातबारा हा मालकी हक्क प्रस्थापित करणारा भाग असला तरी महसूल दप्तरामध्ये अशा प्रकारचे २१ नमुने असतात. यातील गावनमुना क्र. १ मध्ये गावातील भूमी अभिलेखाचा मुख्य दस्तऐवज असतो. यामध्ये वनजमीन, गावठाण याच्या नोंदी असतात. गाव नमुना दोन मध्ये गावातील जमीन आणि महसूल आकारणीची माहिती असते. नमुना क्र. ३ मध्ये शुल्क विलंबाच्या नोंदी असतात. ४थ्या गाव नमुन्यामध्ये तलाठी कार्यालयातील दैनंदिन जमा – खर्च नोंदवलेला असतो. नमुना क्र. ५ मध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ, जमिनीचा महसूल आणि जिल्हा परिषदेच्या कराची माहिती असते. नमुना क्र. ६ मध्ये मालकी हक्कात झालेल्या बदलाच्या नोंदी असतात. म्हणजे खरेदी – विक्रीच्या नोंदी आणि वारसाच्या नोंदी असतात. यातील ६ क मध्ये वारस नोंद स्वतंत्र असते. यातील सात क्रमांकाच्या नोंदीमध्ये मालकी हक्काची नोंद असते. म्हणजे सात क्रमांकावरची नोंद ही महत्वाची.

सातबारा सुटा होण्याची गरज का ?

सातबारा सुटा झाल्याने मालकी नोंदी चुकत नाहीत. एकाच भूखंडावर नोंदलेल्या अनेक मालकांमुळे काही जणांची नोंद कागदोपत्री होईल पण तो भूखंडच नसतो, अशा प्रकारच्या तक्रारी आल्याने सातबारा सुटा करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. या नोंदी सज्जेनिहाय असतात. आमच्या अख्त्यारितील २९ सज्ज्यांपैकी प्रत्येक एका भूखंडावरील सातबारे सुटे करण्याची उद्दिष्ट घेऊन आखणी केली जात आहे.