छत्रपती संभाजीनगर : सलग तीन वेळा पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला. केवळ १२ दिवसाच्या प्रचाराच्या जीवावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील ८५८७६ मते मिळवून विजयी झाले. चव्हाण यांना ६७हजार ७५२ एवढी मते पडली. पहिल्या पसंती अखेर पूर्ण न केल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या टप्प्याटप्प्याने हस्तांतर करत आणि उमेदवार वजा करत ३६ तासांहून अधिक काळ सुरू असणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेनंतर उशिरा रात्री डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १८ हजार १२४ च्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एक लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे शेकडा प्रमाण ६२.५३ टक्के होते. मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. ४१ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघावरील हक्क भाजपने सोडून राष्ट्रवादी काॅग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. प्रचारात मंत्री अतुल सावेंसह भाजपची चमू राहील असेही सांगण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह , नाराजी दाखवत समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनीही सतीश चव्हाण यांच्या नावाला शेवटी पसंती दिली. ‘ महायुती ’ प्रचंड राजकीय ताकद असताना आणि महाविकास आघाडीत ताळमेळ नसताना डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मते घेतली. गेली अनेक वर्षे ज्या शरद पवार यांनी सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली त्यांनी यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील हे उमेदवार असल्याचे पोहोचवले. खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी प्रचारसभा घेत उमेदवार उमेदवार बदलेल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांच्या संदेशामुळे मराठवाड्यातील अनेक शिक्षण संस्थाचालक डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या बाजूने कामाला लागले होते.
दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या बाजूने भाजपचे नेते पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे आदींनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, सत्ताविरोधी मतांच्या एकत्रिकरणाला डॉ. पाटील यांच्या नातेसंबंधाची मोठी साखळी असल्याची चर्चा प्रचारात होती. समाजमाध्यमांमध्ये चव्हाण विरोधी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांच्या नोंदणीपासून ते प्रचारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा महायुतीकडे होती. तसेच गेली अनेक वर्षे सतीश चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविणारा भाजपही चव्हाण यांच्या बाजूने महायुतीम्हणून उभा हाेता. तरीही डॉ. पाटील यांनी ८५ हजार १२४ मते घेतली.
पहाटे आमदारकीचे प्रमाणपत्र
मतमोजणीनंतर मध्यरात्री डॉ. प्रताप पाटील समर्थकांनी गुलाल उधळला तरी प्रक्रिया पूर्ण होण्यास पूर्ण रात्र गेली. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेस मान्यता प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले. पहाटे विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे – चवरे यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर झालेल्या या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.
वैध मतांचा कोटा उमेदवारांपासून दूरच
मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९, तर दुसऱ्या फेरीअखेर एकत्रित १ लाख ४० हजार ५४३ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या आकडेवारीनुसार एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पण तो विजयी उमेदवारासही पूर्ण करता आला नाही.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवास आठ हजार मते
महाविकास आघाडीत बिघाडी ठरणारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेेदवार दिलीप घुे यांना केवळ ८ ८ हजार ४३९ मते मिळाली. तर समाज माध्यमी प्रभावक असणारे अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५ मते मिळाली.
३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल, दुसऱ्या पसंतीचा कल असा
मतहस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मते देण्यात आली. दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली.
