छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महायुतीमध्येच लढविली जाणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांचा महायुतीचे उमेदवार म्हणून मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत घेतली जावी, यासाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही होते.

मात्र, जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असली तरी याबाबतचा निर्णय जाहीर करण्याचे अधिकार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच आहेत. पण ही निवडणूक ‘महायुती’ म्हणूनच लढविली जाणार आहे,  असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ चिन्ह असणार नाही.

महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाने जिंकली होती, ती त्याच पक्षाकडे राहील, असे ठरविण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या नावावर ‘महायुती’चा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल असे सांगण्यात येत होते. विशेषतः भाजपच्या नेत्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कमळ चिन्हासह उमेदवार असेल असा दावा करत होते.

पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. उमेदवार कोणीही असला तरी या वेळी जिंकण्याची संधी अधिक होती, असा दावा भाजपचे पदाधिकारी करत होते. सलग तीन वेळा निवडून आलेल्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात वातावरण आहे, अशी कुजबूजही सुरू झाली होती. मात्र, महायुतीचे उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा असेल असे भाजपने स्पष्ट केले आहे.

१९ आमदार, दोन कॅबिनेट मंत्री अशी मराठवाड्यात भाजपची ताकद असताना पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार दिला जाणार नाही, हे बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. ७६ तालुक्यांत पसरलेल्या या मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी जो उमेदवार प्रयत्न करतो तो निवडून येतो, असे म्हटले जाते. याशिवाय उमेदवाराचा सर्वपक्षीय संपर्कही लागतो. या मतदारसंघात एकेकाळी भाजपचा वरचष्मा होता. श्रीकांत जोशी यांना पराभूत करून सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात वर्चस्व मिळवले. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपला यश मिळाले नाही.

गेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नोंदणीची जबाबदारी भाजपने प्रवीण घुगे यांच्यावर सोपवली होती. ते या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या वेळी माजी आमदार संजय केनेकर यांच्याकडे नोंदणीची जबाबदारी देण्यात आली आहे. नोंदणीचे कामही केले गेले. काही उमेदवारांची चाचपणीही केली. पण महायुतीमुळे या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हाचा उमेदवार असणार नाही. सलग तीन वेळा सतीश चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार उभे करणाऱ्या  भाजपला आता महायुतीचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या पाठिशी उभे रहावे लागणार आहे.