छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी रात्री ११. ४५ मिनिटांनी सिद्धार्थ उद्यानात जाणार आहेत. तसा दौरा महापालिकेसही सादर करण्यात आला आहे. या अभिवादनाच्या वेळेबाबत ठाकरे यांना परवानगी द्यायची की नाही यावरुन महापालिका  आणि पोलीस प्रशासनात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सकाळी ९.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहरण होत असते. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने अभिवादनासाठी आदल्या दिवशी मध्यरात्री परवानगी द्यायची की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 सिद्धार्थ उद्यानामध्ये १७ सप्टेंबर दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होतो.  या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.  या वेळी  स्वातंत्र्य सैनिकांना बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन केले जाते. या वेळी  उपस्थित लोकप्रतिनिधीही स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतात. या पूर्वी कधीही कोणी रात्री अभिवादनास जाऊ, असे  म्हटले नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावतीने  उद्धव ठाकरे यांना अभिवादनास जायचे असल्याचे पत्र महापालिकेस देण्यात आले आहे.  या अनुषंगाने आयुक्त अमोल येडगे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ अभिवादन कोणालाही करता येते. पण प्रश्न मुख्यमंत्र्याच्या सुरक्षा कड्याबाबतचा आहे. अद्याप या अनुषंगाने पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली नाही. ती झाल्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. ’  मध्यरात्री पहिले अभिवादन करण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमावरुन राजकीय वातावरण तापले जाण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी परवानगीचे बोट महापालिकेच्या दिशेने दाखवले. यामुळे नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

 ध्वजारोहणाच्या पूर्वी सुरक्षेच्या अनुषंगाने एक रंगीत तालीमही केली जाते. मुक्ती दिनाच्या आदल्या दिवशी ११. ४५ वाजता ठाकरे यांना परवानगी दिल्यास सुरक्षाविषयक काही प्रश्न उभे राहतात का, याचा आढावा पोलिसांकडून होईल, असे सांगण्यात येत आहे.  स्वातंत्र्यसैनिकांना पहिले अभिवादन कोणाचे, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. या कार्यक्रमानंतर मराठवाडा मुक्ती दिनी उद्धव ठाकरे शिवसैनिकांबरोबर   धरणे आंदोलन करणार आहेत. दुपारी १२ च्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार असल्याचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. अभिवादनास परवानगी दिली तर पहिले अभिवादन शिवसेनेच्या वतीने होईल, आणि परवानगी नाकरली तर स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मृतीस्तंभास अभिवादन करण्याची परवानगी सरकार देत नाही, अशी बदनामी होऊ शकते म्हणून प्रशासन पेचात अडकले आहे.