मराठवाडय़ात ठिकठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी दुपारी बीड जिल्ह्य़ातील शिरुर कासार तालुक्यातील वंजारवाडी येथे वीज पडून स्वाती भीमा पालवे या १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातही एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून, काही जनावरेही दगावली आहेत. लातूर, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ातही पावसाने हजेरी लावली.
बीड जिल्ह्य़ातील माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे वीज पडून एक शेळी ठार तर दोन जखमी झाल्या. शनिवारी रात्री आष्टी तालुक्यातील घाटािपप्री येथे शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. बाळू रोहिदास गायकवाड (वय १५) व दीपक सुरेश पोटे (वय ९) अशी त्यांची नावे आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम तालुक्यात सामनगाव येथील ४१ वर्षीय बाबुराव गोफणे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
वार्ताहर, उस्मानाबाद
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही हस्त नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पावसाने पाण्याअभावी सुकत असलेल्या तुळजापूर, कळंब, उस्मानाबाद व वाशी तालुक्यातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तर भूम, परंडा, लोहारा व उमरगा तालुक्यातील पिके जगण्यासाठी मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनचा पाऊस परतला असला तरी अवकाळी पावसाने केलेल्या आगमनामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळी ८ पर्यंत ८.१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शेतकरी शिवाजी पवार यांची म्हैस वीज पडून दगावली आहे. जिल्ह्यात मागील महिन्याभरापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यावर शनिवारी रात्री व रविवारी सायंकाळपर्यंत काही तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, रूईभर, ढोकी, कोंड, तेर व आळणी परिसरात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसात कोंड येथून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती. त्याचबरोबर कानेगाव येथील तेरणा नदीच्या बॅरेज, तेर येथील तेरणा नदीपात्रातही मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. बेंबळी, ढोकी, येडशी या परिसरात सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने खरीप पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे, अशी परिस्थिती पाऊस झालेल्या तुळजापूर, कळंब व वाशी या तालुक्यांमध्ये राहणार आहे.
उमरगा, लोहारा, परंडा व भूम तालुक्यात महिनाभरापूर्वी पाऊस झाला आहे. त्यामुळे या चार तालुक्यात आजही मोठी दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्यासाठी मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी हतबल होत आहेत. रविवारी या चारही तालुक्यात रात्रीच्या सुमारास पावसाळी ढग मोठय़ा प्रमाणात दिसून येत होते.
जिल्ह्यात सरासरी ३५७ मिलीमीटर पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी ७६७ मिलीमीटर आहे. पकी आतापर्यंत फक्त ३५७ मिलीमीटर पाऊस झाला. पावसाळा संपला. आता अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पांत मृतसाठय़ाखालीच पाणी आहे. या पावसाने बंद पडत असलेल्या पाणीस्रोतांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक १३.७५ मिलीमीटर पाऊस झाला. तुळजापूरमध्ये १२.४३, उमरगा तालुक्यात १०, लोहारा १.३३, भूम ५.६०, कळंब २.१७, परंडा १२.६० तर वाशी तालुक्यात ७.३३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ८.१५ मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण पावसाच्या सरासरीत ३५७ मिलीमीटर इतका पाऊस आजपर्यंत झाला आहे.
कारेपुरात अतिवृष्टी; रेणापूर, औशात दमदार पाऊस
वार्ताहर, लातूर
रेणापूर तालुक्यातील कारेपूर मंडलात ढगफुटी झाल्यासारखा प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे शेतातील बांध फुटून गेले. अनेक शेतकऱ्यांची प्रचंड मातीही या पावसाने वाहून गेली. काढणीस आलेल्या सोयाबीनचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त असल्यामुळे रेणापूर व औसा तालुक्यातील शेतकरी आनंदून गेले आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी लातुरात पावसाने हजेरी लावली. उदगीर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कारेपूर मंडळात १०९, रेणापूर ३०, औसा ३६, लामजना १६, किल्लारी १२, मातोळा ३२, कासार बालकुंदा १७, निटूर १५, उजेड २१ असा चांगला पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असल्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी योग्य पाऊस होऊनही शेतकरी पेरणीस धजावत नाहीत. रब्बी हंगामात पेरणी झाल्यानंतर पाऊस झाला तर उगवण क्षमतेवर परिणाम होतो हे शेतकऱ्याला माहिती असल्यामुळे उशिरा पेरा झाला तरी फारसे बिघडत नाही हे लक्षात घेऊन शेतकरी आता पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहतो आहे. पेरणीसाठी बी-बियाणाची जांगजोड करण्यात शेतकरी गुंतला आहे.
पाऊस चांगला झाला असल्यामुळे आता रब्बीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची आशा निर्माण झाली असून उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन व तुरीसाठीही हा पाऊस उपयुक्त आहे. काढणीस आलेल्या सोयाबीनसाठी हा पाऊस त्रासदायक असला तरी सोयाबीनचे उभे पीक असेल तर अशा पावसाचा फारसा परिणाम होत नाही.
रविवारी सकाळी ८ वाजता पडलेल्या २४ तासातील पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. लातूर २.७५ (३९४.०५), औसा १५.४३ (३६९.९), रेणापूर ३४.७५ (४९४), उदगीर निरंक (३०९.६३), अहमदपूर ०.८३ (३२०.६६), चाकूर ३.२० (३८१.६), जळकोट ६ (४०६.५), निलंगा ५.८८ (४५४.४३), देवणी ०.६७ (५२५.२९), शिरूर अनंतपाळ ११ (३९६.९८), सरासरी ८.०५ (४०५.३).