छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वळवाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे फळबागांचे; तसेच भाजीपाल्याचे नुकसान हाेत असून मराठवाड्यात हिंगोली, लातूर व नांदेडमध्ये वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तीन शेतकरी आणि अनेक ठिकाणी गाय, बैल आणि शेळ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रविवारी दुपारपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाळी वातावरण होते. छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारपासून सरीवर सर पडत होत्या. अनेक भागांत पावसाचे पाणी साठले. शिवाजीनगर रेल्वेगेटवरील वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून २५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी शिरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनधारकांची तारांबळ उडाली. चार किमीचा फेरा मारून संग्रामनगर उड्डाणपुलावरून वाहनधारकांना ये-जा करावी लागली. अखेर अग्निशमन विभागाने पंपाच्या साह्याने पाणी उपसा केला.

हिंगोली शहरात शनिवारी सायंकाळी, तर जिल्ह्यातील काही भागांत दुपारी चारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. या वेळी सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर शिवारात अंगावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला, तर गुगूळ पिंपरी शिवारात वीज पडून ७ शेळ्या आणि भगवती शिवारात एक बैल दगावल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा येथे गुणाजी कदम या ६५ वर्षांच्या मजुराचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायत अजगर खान मिया खान (वय ६२) यांचा वीज पडून मृत्यू झाला. निलंगा तालुक्यातील अनसरवाडा, चाकूर तालुक्यातील मांडुरकी येथे ,जालना जिल्ह्यातील भोकरदन, परभणीतील मंठा तालुक्यातील तळणी येथे अंगावर वीज पडून गाय आणि बैलांचे मृत्यू झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील फळबागांना फटका बसला. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा या परिसरात केळी व पपईचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.