छत्रपती संभाजीनगर : दमणगंगा – पिंजाळ – एकदरे या नदीजोड प्रकल्पातून पाणी उपलब्धतेची माहिती निश्चित झाली असून नव्याने ९१ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होऊ शकेल. सर्वेक्षणासाठी २०३ कोटी रुपयांच्या खर्चासाठी लवकरच निविदा निघतील. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक लाख कोटी रुपये लागू शकतील, असा अंदाज विखे पाटील यांनी व्यक्त केला. जायकवाडी व नांदूर मधमेश्वर पाणी नियोजनाच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केवळ दमणगंगा नाही तर वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्पासाठी अतिरिक्त एक लाख कोटी रुपये लागतील, असेही ते म्हणाले.

योजनांसाठी लागणाऱ्या निधीचे हे अंदाजे आकडे ऐकल्यानंतर पत्रकारांनी जलसंपदा विभागाचे दरवर्षाचे अंदाज पत्रक किती असते आणि याच्या किती पट हे आकडे आहेत, असा प्रश्न विचारला असता ही सगळी तरतूद अंदाजपत्रकाबाहेरून करावी लागेल. यासाठी जागतिकस्तरावरून कर्ज घ्यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. मात्र, गुजरातच्या नदीजोड प्रकल्पाला चालना मिळाल्यानंतर पुन्हा एकदा उल्हास खोऱ्यातून गुरुत्वीय पद्धतीने बोगद्यातून पाणी आणण्याची योजनेने उचल खाल्ली. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मनावर घेतला असून तो पूर्ण केला जाईल, असा दावाही राधाकृष्ण विखे यांनी केला.

खरे तर दिवंगत बाळासाहेब विखे यांनी नदी जोड प्रकल्पाचा मुद्दा विधिमंडळात मांडला होता. पण मधल्या काळात केवळ बाळासाहेब विखे पाटील हा मुद्दा मांडत आहेत, म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. उल्हास खोऱ्यातून मराठवाड्यास पूर्वी ५८ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. पुढे हे पाणी ७४ अब्जघन फूटापर्यंत वाढू शकते, असे सांगण्यात आले. मात्र, सर्व्हेक्षणातून ते ९१ अब्ज घनफूट असेल असे सांगण्यात आले आहे. पण हे पाणी आणण्यासाठी एक लाख कोटी रुपये लागतील, असे राधाकृष्ण विखे म्हणाले.