एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात सूर्य आग ओकू लागला असून तापमान तब्बल ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढीस लागले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्य़ातील सर्व डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आले असून उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात २४ तास ‘कोल्ड वार्ड’ हे आपत्कालीन उपचार केंद्र कार्यरत करण्यात आले. आता उष्णता लहरी आणि तापमान वाढ हे विषय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ातही समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
प्रत्येक जिल्ह्य़ाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ एप्रिलला दिले होते. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक होऊन जिल्ह्य़ात वारंवार उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आपत्तींबाबत चर्चा झाली. वीज प्रपात, पूर, भूकंप, आग लागणे या विषयांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ात समावेश असला, तरी तापमान वाढ, उष्णतेची लाट या विषयांचा समावेश नाही.
जिल्ह्य़ात दरवर्षीच कमालीचे तापमान असते. अनेक वेळा ते ४४ अंशाच्याही पुढे जाते. त्यामुळे उष्माघात व उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. सध्या तापाची साथ असून अनेक लहान मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी उष्णता लहरी व तापमानवाढ हे विषय आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ात समाविष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, उष्माघात वा उष्णताग्रस्त रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात २४ तास कोल्ड वार्ड (शीतकक्ष) हे आपत्कालीन उपचार केंद्र कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील १३ वर्षांचा इतिहास पाहता विलक्षण तापमानवाढीला प्रतिरोध नसल्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नांदेड जिल्हा हा पूरप्रवण आहे. या पाश्र्वभूमीवर नदी-नाल्यांची साफसफाई, पुलांच्या मुखाला साठलेला कचरा काढण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या तुप्पा येथील डम्पिंग ग्राउंडवर आग लागली होती. कचऱ्यात काच, फुटलेल्या बाटल्यांचे तुकडे अशा वस्तूही असतात. साठलेल्या कचऱ्यात मिथेन नामक ज्वलनशील वायू तयार होतो. तापमान वाढल्यानंतर काचेच्या माध्यमातून एकाच ठराविक ठिकाणी उन्हाचे किरण एकवटतात. प्रचंड तापमानामुळे मिथेन वायू पेट घेतो. तुप्पा येथील प्रकार त्यातूनच झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. एल. कोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी, मनपा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिझा परहातुल्ला बेग आणि मुख्य अग्निशमन अधिकारी शेख रईस पाशा आदी उपस्थित होते.
इंग्रजी शाळा सुरू
शहर परिसरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. संस्थाचालकांच्या या कार्यपद्धतीवर पालकवर्गाची ओरड सुरू झाली आहे. भर उन्हात चिमुकल्यांना घरी परतावे लागत असून अनेक विद्यार्थ्यांना आजाराने घेरलेले दिसून आले.