छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये ओल निर्माण झाली आणि या तीन जिल्ह्यात शेतशिवारात गोगलगायी उगवलेले पीक खावून टाकत आहे. या जिल्ह्यात केवळ ४० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे सारे पीक हातचे जाईल, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात येते.

रेणापूर तालुक्यातील गोढाळा गावाचे शेतकरी संभाजी अबरबंडे म्हणाले, हे सगळे रिमझिम पावसामुळे सुरू झाले. गोगलगायी या पावसात वाढल्या. त्यांचे प्रमाण एवढे आहे, की साडेतीन एकरापैकी ७५ टक्के क्षे़त्र गोगलगायींनी खाल्ले आहे. आता उरलेले पीक काढून टाकावे लागेल अशी स्थिती आहे.

धाराशिवच्या कळंब तालुक्यात गोगलगायींची संख्या कमालीची वाढली आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले आमदार कैलास पाटील यांना एक वृद्ध महिला म्हणाली, ‘ रात्री ये गोगलगायी बघायला. तुझ्याकडे पेट्राेल पैसे नसतील तर मी देते. पण बघ कसं गोगलगायी शेत फस्त करतात. ’ या परिसरातील शेताचे पंचनामे करावेत, अशी विनंतीवजा सूचना आमदार पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांना केली आहे.

लातूर, धाराशिव जिल्ह्यातून येणाऱ्या गोगलगायीच्या तक्रारीनंतर कृषी अधिकाऱ्यांनीही काही ठिकाणी भेटी दिल्या. या अनुषंगाने लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेश तीर्थपुरीकर म्हणाले, ‘या गोगलगायीचा प्रादुर्भाव खूप पसरलेला नाही. २०२२ मध्ये तो खूप अधिक होता. अजूनही अधिक पाऊस झालेल्या किंवा तलावा शेजाराच्या भागात गोगलगायीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. तीन चार प्रकारच्या गोगलगायी आहेत. त्या ‘खादाड’ श्रेणीतील आहेत. यावर फक्तच औषध काम करते. मेटल अलडिहाईड नावाचे औषध टाकल्यास गोगलगायी मरतात. हे औषध प्रति किलो ९०० रुपयांपर्यंत मिळते. त्यास ५० टक्के शासनाने अनुदानही आहे. ज्या शेतकऱ्यांनी औषध खरेदी करुन त्याची पावती कृषी सहाय्यकाकडे जमा केली असेल त्यांना ते अनुदान उपलब्ध होऊ शकते. ’

या गोगलगायी तीन ते चार इंचावर अंडी घालतात. एकवेळी २५ ते ३० अंडी दिसून येतात. साबुदाण्याच्या आकाराच्या अंड्यातून गोगलगायी बाहेर पडतात. त्या कोवळी पाने खातात. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अनेक भागातून गोगलगायी वाढत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एका बाजूला सोयाबीन पिकांच्या उगवण क्षमतांच्या तक्रारी येत आहेत आणि दुसरीकडे आलेल्या पिकांमध्ये गोगलगायीचे मोठे संकट असल्याचे शेतकरी सांगत आहेत.