छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ७५ नगरपालिका क्षेत्रात सरासरी सहा दिवसाला होणारा पाणीपुरवठा हळुहळू घटत जाईल. धरणे तळाला गेल्याने धरणाच्या पोटात चर खणावी लागणार आहेत. जायकवाडी धरणाशिवाय अन्य धरणांमध्ये बुडक्या घेण्यासह शहरातील विंधन विहिरीतून टँकरसाठी पाणीपुरवठा करावा लागेल, असे अहवाल नगरपालिका प्रशासनास अधिकार्‍यांनी दिले आहेत.

सर्वात कमी पाऊस असणार्‍या धाराशिव जिल्ह्यातील लोहरा नगरपालिकेत पुरवठ्यासाठी केवळ सप्टेंबरपर्यंत पाणी असेल. यामुळे गावोगावच्या विहिरी अधिग्रहित करून पाणी घ्यावे लागेल. धाराशिव, तुळजापूरसह भोवतालच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी १५० किलोमीटरहून उजनीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. रेल्वेने पाणीपुरवठा कराव्या लागणार्‍या लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या विहिरी आणि १०६१ विंधन विहिरींवर अवलंबून राहावे लागणार आहे.

उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लिंबोटी नावाच्या धरणात पाणबुडी पंप टाकून पाणी उपसा करावा लागणार आहे. अशीच स्थिती अहमदपूरची आहे. औसा शहरास डिसेंबर अखेरपर्यंत पाणी पुरेल पण त्यानंतर तावरजा प्रकल्पात चर खणून पाणी उद्भव विहिरीपर्यंत आणण्याची कसरत करावी लागणार आहे. तोपर्यंत ४३ विंधन विहिरीतून पाण्याची गरज भागवली जाऊ शकते, असे नियोजन केले जात आहे.

शिरूर अनंतपाळ या तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला असून या तालुक्यातील घरणी धरणाच्या पोटात चर मारावी लागणार आहेत. वेळ पडल्यास या धरणात विहीर खोदावी लागेल, असेही कळविण्यात आले आहे. देवणीच्या पाणीपुरवठ्यासाठी तळ्यात बुडकी मारव्या लागतील. रेणापूरमध्येही चरी खोदाव्या लागतील, असे कळविण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि बदनापूर या दोन शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई जाणवेल असे चित्र आहे.

भोकरदनला पाणीपुरवठा करणार्‍या धरणात केवळ पाच टक्के पाणी साठा आहे. याच महिन्यात भोकरदन शहरात टँकरने पाणी द्यावे लागेल, तर बदनापूरमध्ये सोमठाणा धरणाच्या पोटात चर घ्यावे लागणार आहेत. धनसांवगी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मांदळा धरणात केवळ तीन टक्के एवढाच पाणीसाठा आहे. या शहरात आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. चर खोदून उद्भव विहिरीपर्यंत पाणी आणण्याची प्रक्रिया मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक शहरात करावी लागणार आहे.

रोज पाणी नाहीच

मराठवाड्यातील ७५ नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात कोठेही दररोज पाणी येत नाही. परभणीतील मानवत शहरात गेल्या दहा दिवसापासून पाणी आले नाही. काही गावांत आठ दिवसाला एकदा पाणी येते. पुरवठ्यातील गोंधळात आता तळाला गेलेल्या धरणामुळे शहरी भागातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करेल. काही मोजक्या शहरात मार्चनंतर पाणी पुरेल. यामुळे शहरी भागात टँकरने पाणीपुरवठ्यासाठी धरणाच्या पोटात चर खोदणे अपरिहार्य होईल, असे कळविण्यात आले आहे. जालना, धाराशिव तसेच लातूर जिल्ह्यात टंचाईचे चित्र भीषण होईल. अगदी ऑक्टोबरपासून ही भीषणता जाणवू लागली आहे.