छत्रपती संभाजीनगर – “आता विंधन विहीर (बोअर) घेण्यावर प्रतिबंध करणारे सरकारी आदेश धडकतील. त्यासाठी तत्काळ बोअर घ्या, बोअर. एक नव्हे तर दोन-तीन घ्या. कारण एकाला पाणी नाही लागले तर दुसऱ्या बोअरला तरी लागेल…” बोअरवेल घेऊन देणाऱ्या दुकानांमध्ये गेलात तर वरील सल्ला ऐकायला मिळेल.

येत्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज आटत चाललेल्या जलसाठ्यांमधून बांधता येत आहे. मराठवाड्यातील जमिनीची पाणीपातळी ९ मीटरपर्यंत खालावली आहे. विंधन विहिरींमधूनही पाणी मिळेनासे झाले आहे. शेतांमधील फळबागांसारखी पिके जगवायची असतील तर पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. फळबागधारकही आटत आलेल्या नैसर्गिक जलस्रोतांवर उपाय म्हणून विंधन विहिरी घेण्याच्या तयारीत असून, बोअरवेल खोदणाऱ्या दुकानदारांशी संधान बांधून आहेत.

बोअरवेल दुकानदारांकडून सध्या ६५ ते ७० रुपये फूट विंधन विहीर खोदण्याचा दर सांगितला जात आहे. हा दरही ३०० फुटांच्या आतील खोदाईसाठीचा आहे. साडे चार ते साडे सहा इंच व्यासाच्या बोअरसाठी ३०० फुटांपर्यंतचा दर पाहता खर्च २१ हजार रुपयांच्या आसपास तर ३०० ते ४०० फूट खोल खोदण्यासाठीचा दर ८० रुपये फूट असून, त्यासाठी ३२ हजारांपर्यंतचा खर्च आहे. ४०० ते ५०० फुटांपर्यंतचा दर ९० रुपये फूट तर ५०० च्या पुढचा दर २० रुपये प्रतिफूटांपर्यंत वाढणार सांगितला जात आहे.

विंधन विहीर खोदण्यापर्यंतचाच खर्च नसून, ७ इंच व्यासाची वाहिनी (पाईप) खोदलेल्या भागात सोडणे, पंप बसवणे, वीजजोडणी, सुरुवात करणारी यंत्रणा, असा एकूण खर्च पाहता ८० हजार ते १ लाख रुपयांवर जात असल्याचे चित्र आहे. शिवाय एक विंधन विहीर खोदण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षाही करावी लागत असल्याचे बोअरवेलच्या बाजारपेठेत दिसत आहे.

मोसंबीची ८०० पेक्षा अधिक झाडे आहेत. तीन वर्षांपूर्वीची ही फळबाग जगवायचा प्रयत्न सुरू आहे. शेतातील १४ परस असलेल्या विहिरीने तळ गाठला आहे. परिणामी झाडे जगवण्यासाठी विंधन विहीर घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादी आहे. ६५ रुपये फुटापासून पुढे बोअरचा दर सांगितला जात आहे. – विनायक हाके, आडगाव.

संभाव्य टंचाईचे संकट पाहता उपाययोजनांशी संबंधित सरकारी आदेश निघू शकतात. विंधन विहिरीसाठी ३०० ते ४०० फूट खोदाईसाठी ८०, त्यापुढे पाचशे फूटपर्यंत प्रतिफूट १० रुपयांचा खर्च वाढणार आहे. तर ५०० फुटापुढे प्रतिफूट २० रुपयांचा दर आहे. खोदाई, पाईप, पंप, वीजवाहिनी व इतर खर्च पाहता एक लाखाच्या आसपासपर्यंतचे खर्चाचे गणित आहे. – नवाज पठाण, व्यावसायिक.