scorecardresearch

टोमॅटोचे दर शंभरीच्या उंबरठय़ावर; उन्हाच्या फटक्यामुळे शिवार करपले

टोमॅटोचे दर शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. औरंगाबादेत टोमॅटोचा किलोचा दर ८० ते ९० रुपयांपर्यंत भडकला आहे.

औरंगाबाद : टोमॅटोचे दर शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. औरंगाबादेत टोमॅटोचा किलोचा दर ८० ते ९० रुपयांपर्यंत भडकला आहे. ३४ ते ३५ तापमानापर्यंत तग धरणाऱ्या टोमॅटोना वाढत्या उन्हाचा फटका बसला असून पिकाचा शिवार (प्लॉट) जळून गेल्याने आवकही मंदावली आहे. औरंगाबाद जाधववाडी उच्चतम बाजार समितीत सध्या दोन ते अडीच हजार कॅरेट टोमॅटोची आवक होत आहे. जिल्ह्यातील फुलंब्री, बाजारसावंगी, वडोदबाजार, गल्लीबोरगावसह अहमदनगर जिल्ह्यातूनही माल बाजारात येतो आहे, तर काही माल दक्षिण भारतात पाठवला जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारात आणलेल्या एका कॅरेटमध्ये २० ते २४ किलोपर्यंत टोमॅटो बसतो. या कॅरेटमधील टोमॅटोची ठोक विक्री ३२ ते ३५ रुपये किलोप्रमाणे होते. तर शहराच्या विविध भागापर्यंत टोमॅटो नेऊन वाहतूक, मजुरीचा खर्च आणि नफ्याचे प्रमाण पकडून टोमॅटोचे दर ८० ते ९० रुपये किलोने त्याच्या गावरान, हायब्रीडच्या वाणानुसार विक्री होत आहेत.

टोमॅटो उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या वरुड काझीमधील उत्पादक आणि व्यापारी असलेले कैलासराजे दांडगे यांनी सांगितले, की परिसरात सध्या एकही टोमॅटोचे शिवार (प्लॉट) नाही. टोमॅटो साधारण ३४ ते ३५ अंश तापमानापर्यंत तग धरून राहणारे पीक आहे. मात्र, उन्हामुळे टोमॅटोची रोपे जळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. सूर्य डोक्याकडे कलत असतानाच्या काळात साधारपणपणे शेतकरी पिकांना पाणी देत नाही. बऱ्याच वेळा त्याला पुन्हा पाणी देता येण्यासारखी परिस्थितीही ग्रामीण भागात अनुकूल नसते. अशा काही कारणांमुळे टोमॅटोचे शिवार करपून गेले असून त्यामुळे बाजारातील आवकेवरही परिणाम झालेला आहे.

साधारणपणे डिसेंबर, जानेवारीत लागवड झालेला टोमॅटो मार्च, एप्रिल, मे पर्यंत बाजारात येतो. जुलैपर्यंत मालाची आवक सुरूच असते. परंतु सध्या उष्णतेमुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. – कैलासराजे दांडगे, उत्पादक, व्यापारी.

बाजारात सध्या आवक मंदावली आहे. दोन ते अडीच हजार कॅरेटपर्यंत माल येतो आहे. त्याला ठोक बाजारात ३२ ते ३५ रुपये किलोपर्यंतचा दर गावरान, हायब्रीड टोमॅटोचा प्रकार पाहून  मिळतो आहे.

– संतोष बोंबले, आडत व्यापारी.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market committee tomato prices one hundred heat of the sun ysh