छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली धाराशिव, बीड येथील संचारबंदी बुधवारी उठविण्यात आली. मात्र, भय आणि अफवांमुळे बाजारपेठा बंद होत्या. मंगळवारी उशिरा रात्री पाटोदा तालुक्यातील पुसळंब येथे अज्ञातांनी पोलीस चौकी पेटवून दिली. तर पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. हिंगोली येथे नव्याने दोन जणांच्या आत्महत्या आरक्षणाच्या मागणीसाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारातील घटनांमध्ये ९९ जणांना, नांदेडमध्ये ५० जणांना तर धाराशिवमध्येही हिंसक आंदोलकांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाडय़ातील विविध भागांत रास्ता रोको, मुंडण आंदोलन, मनोऱ्यावर चढून आंदोलन करण्याचे प्रकार बुधवारी सुरू होते.
एका बाजूला सर्वपक्षीय बैठक सुरू असताना मराठवाडय़ातील विविध भागांत आरक्षण मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उभे होते. बीड जिल्ह्यातील हिंसक आंदोलनात नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी गुन्ह्याच्या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बीड, जालना येथील इंटरनेट सुविधा बंद केल्यानंतर आज बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. गृहविभागाच्या अतिरिक्त सचिवांनी ४८ तास सेवा सुरू करू नयेत, असे आदेश बजावले आहे.
हेही वाचा >>>मराठवाडय़ात जाळपोळ, दगडफेक सुरूच ; बीड, धाराशिवमध्ये संचारबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात
गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे स्थानिक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यवहार सुरळीत आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्यांमधील आंदोलने शांततेत सुरू आहेत. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश असून शस्त्रास्त्र बाळगण्यावर तसेच जनक्षोभ घडवून आणणारा आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर लिहिण्यास अटकाव असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
नगर परिषद राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
नगर परिषद प्रशासन संचालनालयांतर्गत राज्यसेवा विविध संवर्गातील १ हजार ६७८ पदांसाठी या आठवडय़ात होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भातील आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, निवड समितीचे अध्यक्ष मनोज रानडे यांनी काढले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत संभ्रम आहेत. १६ प्रवर्गातील १९ हजार पदांसाठी ही परीक्षा असल्याचे सांगण्यात येते. छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांतील आंतरजाल सेवा बंद करण्यात आलेली असल्याने प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध ४३२ पदांसाठी परीक्षा घेण्याची ठरविण्यात आले होते. राज्यात १९ हजार पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन मंडळाची बस वाहतूक पूर्णत: बंद असल्याने उमेदवार कसे येतील, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.