छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून सामूहिक कॉपी होत असल्याचा प्रकार मंगळवारी आढळून आल्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरा देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोषींच्या निलंबनाचेही प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आता महाविद्यालयामधील कर्मचारी वर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी जैतापूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता बारावीचे विद्यार्थी एकाच बाकावर बसून उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे आढळून आले. तसेच केंद्रावरील दालन १ ते ४ च्या वर्गावर पर्यवेक्षण करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिकेमधील उत्तराच्या झेराॅक्स विद्यार्थ्यांना देताना आढळून आल्याचे या प्रकरणाची पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

घटनेचा पंचनामा शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व विस्तार अधिकारी एस. डी. पवार यांनी पंचांसमक्ष केला. सामुदायिक कॉपीचा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय उच्च माध्यमिक व माध्यमिक मंडळाला पाठवण्यात आला. त्यानंतर कन्नड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत नईमोद्दीन यांच्या तक्रारीवरून रात्री देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पी. सी. आवळे, आर. के. दरे, पी. ए. लहाने, संजय कारभारी कडवे, एस. टी. घुले, संतोष भिंगारे, संजय दाभाडे, बी. जे. गायकवाड, बळीराम राठोड, गणेश शेळके, राधा पेरे, नरेश सोनवणे, सचिन सातदिवे, संतोष लिहणार, भागवत निर्मल, एस. पी. बागुल, ऋषिकेश पाटील, अनंता गाडेकर, प्रशांत धुमाळ, व्ही. एफ. बारवाल, करणसिंग चंदवाडे, दीपक सोनवणे, बाळकृष्ण साळवे व छाया नरसिंग मुंगे अशी गुन्हा दाखल झालेल्या २३ जणांची नावे आहेत.

राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात घडलेल्या सामूहिक काॅपीच्या प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, निलंबनाचेही प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. केंद्रावरील आधीचा कर्मचारी वर्गही बदलण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सामूहिक काॅपीच्या प्रकाराबाबत तपासणीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आल्या आहेत. – अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी