छत्रपती संभाजीनगर – कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक व माध्यमिक महाविद्यालयांमध्ये बारावीच्या परीक्षे दरम्यान सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार मंगळवारी आढळून आला. या परीक्षा केंद्रावर दक्षता पथकाने भेट दिली तेव्हा तपासणी सुरू असताना बारावीचे विद्यार्थ्यांमध्ये सामुदायिक कॉफी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.
याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र सामुदायिक कॉपीचा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय उच्च माध्यमिक व माध्यमिक मंडळाला प्राप्त झाल्याची माहिती काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी “लोकसत्ता”शी बोलताना दिली.
दरम्यान बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण, महसूल व पोलीस प्रशासनाकडून अभियानात राबविण्यात येत असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आला आहे. यापूर्वी पदवीच्या परीक्षेदरम्यान शहराजवळील दोन केंद्रांवर सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आल्याचा एक प्रकार घडलेला आहे. या संदर्भाने माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल फोन बंद आला.
गुन्हा दाखल करणे सुरू
संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्या केंद्रावरील कर्मचारी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – डॉ. नंदकुमार बेडसे, – अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ
