छत्रपती संभाजीनगर – येथून जवळच असलेल्या देवगिरी किल्ल्यावरील गवताला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कळवण्यात आली. यानंतर तातडीने ड्यूटी इन्चार्ज वासिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली चार फायर मॅन व एक चालक, असे तातडीने रवाना झाले. आग पसरत असल्याने आणखी दोन बंबांसह पथकाला पाचारण करावे लागले. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू होते, अशी माहिती एका पथकातील प्रमुख अधिकारी लक्ष्मण कोल्हे यांनी दिली.
देवगिरी किल्ल्याच्या परिसरातील डोंगरावरील वाळलेल्या गवताला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर आगीने पसरत किल्ल्यावरील काही भागांना वेढा घालण्यास सुरुवात केली. अग्निशमन विभागाचे बंब रवाना झाले. परंतु चारचाकी वाहन किल्ल्यावर कसे नेणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. एका वाहनातील पाणी संपल्यानंतर अन्य दोन बंबांना पाठवण्यात आले. रिकामा बंब माघारी परतला. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते.
सध्या तापमान ४० अंशांच्या टप्प्यात पोहोचलेले असून, उन्हाळ्यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढतच चाललेले आहे. त्यातूनच देवगिरी किल्ल्यावरील एका भागातील गवताला आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच असले तरी किल्ल्याच्या विविध भागांमुळे पाण्याचा मारा करणाऱ्या यंत्रणेच्या लांबीवर मर्यादा पडल्याचे चित्र होते. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. शिवाय आग विझवल्यानंतरही धुमसणाऱ्या गवतातून पुन्हा पेट घेण्याचा धोकाही मोठी वाटत असल्याची चिंता अधिकाऱ्यांमधून व्यक्त होत होती. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास सायंकाळ उजाडेल, असेही सांगितले जात आहे.
उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. दरवर्षीच आगीच्या घटना उन्हाळ्यात घडत असून, देवगिरी किल्ल्यावरील आगही उन्हाळ्यातलाच प्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच छावणीमध्ये एका लग्नकार्याशी संबंधित मंडपच्या गोदामाला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठीही अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागली. भरवस्तीतील आगीचे ठिकाण गाठण्यासाठी कर्मचारी, पथकाला काही घरांवर चढून पाण्याचा मारा करावा लागला. देवगिरी किल्ल्यावरही अधिकारी, कर्मचाऱ्यांना दूरपर्यंत चालत पाण्याचा पाईप आेढत न्यावा लागला. देवगिरी किल्ल्याच्या परिसरात वनराई असली तरी किल्ल्याचा मुख्य बांधकामाच्या भागातून जाताना कसरत करावी लागली.
