छत्रपती संभाजीनगर – शहरातील धुळे सोलापूर महामार्गावर करोडी टोल नाक्याजवळील हॉटेल ग्रँड सरोवरला गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास भीषण आग लागली. चार मजली उंच इमारतीचे हे हॉटेल एका शिवसेना (शिंदे गट) आमदाराचे असल्याची माहिती आहे.

हाँटेल ग्रँड सरोवरला आग लागल्याची माहिती महानगरपालिकेच्या पदमपुरा अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. आगीच्या संदर्भातील कॉल ८ वाजून १० मिनिटांनी आल्यानंतर पदमपुरा अग्निशमन विभागाकडून अधिकारी भगत यांच्या नेतृत्वाखाली दोन बंब रवाना झाले. त्यानंतर कांचनवाडी व एन – ९ चा प्रत्येकी एक व औद्योगिक वसाहतीचे २, असे एकूण सहा बंब आग विझवण्यासाठी पाठवण्यात आले. तसेच महानगरपालिकेचे दहा हजार लिटरचे दोन पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले.

आग विझवण्याच्या कामामध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी वर्ग असल्याचे  पदमपुरा अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. ग्रँड सरोवर हॉटेलला प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तासापेक्षा अधिक कालावधी लागल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेलमध्ये कर्मचारी आणि ग्राहक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र हॉटेल मालकाच्या निकटवर्तीयांनी आणि अग्निशमन दलाने सर्व सुरक्षित असून जीवित हानी टळली आहे, मात्र मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचं स्पष्ट केलं. हॉटेलचे दोन मजले जळाले असून तिसऱ्या मजल्यावर धुरामुळे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती आहे.