छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेत ५ टक्के क्रीडा आरक्षणांतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांना दोन महिन्यांच्या आत नियुक्ती द्यावी, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) सदस्य न्या. पी. आर. बोरा आणि सदस्य विनय कारेगावकर यांनी दिले आहेत.
कल्पेश भगवान वंजारी आणि राधिका दिलीप पाटील यांनी उमेदवारांनी १० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार क्रीडा प्रवर्गातून अर्ज केले होते, मात्र त्यांच्या क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीवरून तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने त्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती. या अर्जांवरील सुनावणी दरम्यान न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, अर्जदारांनी लेखी परीक्षेत मिळवलेली गुणसंख्या आणि त्यांचे क्रीडा प्रमाणपत्र ग्राह्य धरता ते सर्वार्थाने या पदासाठी पात्र ठरतात.
भरती प्रक्रिया आधीच सुरू झालेली असल्याने आणि रिक्त पदे उपलब्ध असल्याने, केवळ तांत्रिक कारणास्तव पात्र उमेदवारांना नियुक्ती नाकारता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधिकरणाने या उमेदवारांना ५ टक्के क्रीडा कोट्यातून सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाला ही सर्व प्रक्रिया दोन महिन्यांच्या मर्यादित कालावधीत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात अर्जदारांतर्फे ॲड. जे. एस. देशमुख यांनी, तर सरकार पक्षातर्फे मुख्य सादरकर्ता अधिकारी एम. एस. महाजन यांनी काम पाहिले.
