छत्रपती संभाजीनगर: ‘ टीसीएस’ प्रकरणात धर्मांतरास प्रोत्साहन देणारी आरोपी निदा खान हिला लपण्यास मदत करणारे नगरसेवक मतीन पेटेल यांची दोन घरे असून त्यांनी या घरांची कागदपत्रे महापालिकेस सादर करावीत, अशी नोटीस त्यांच्या घराला चिकटविण्यात आली आहे. जर त्यांनी घराच्या वैधतेबाबतची कागदपत्रे सादर केली नाहीत तर महापालिकेच्या नियमानुसार कारवाई केली जाईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.
नाशिकमधील लैंगिक छळ व धर्मांतरास प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला मतीन पटेल यांनी आपल्या नारेगाव येथील घरी लपवून ठेवले होते. त्यामुळे मतीन पटेल यास नाशिक पोलिसांनी सहआरोपी केले आहे. आता ज्या घरात निदा खान हिस ठेवण्यात आले होते ते घरच वैध आहे काय, याची तपासणी केली जाणार आहे.
या घराच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावीत, अशी नोटीस त्यांच्या घराला डकविण्यात आली आहे. त्यांची दोन घरे असून महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवाराने दिलेल्या शपथपत्रात या घरांचा उल्लेख आहे का, हे तपासले जात आहे. तसे असेल तर महापालिकेचे कर भरले आहेत का, बांधकाम परवाना घेतला होता का, हेही तपासले जाणार असून त्यात त्रुटी आढल्यास कारवाई केली जाईल असे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाकडून ही तपासणीची कारवाई सोमवारी हाेऊ शकते. यानंतर म्हणजे मंगळवारी मतीनच्या घरावर कारवाई होऊ शकते. ही कारवाई ‘ बुलडोझर’ सह असू शकेल असे सांगण्यात आले.
दरम्यान शुक्रवारी व शनिवारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पाेलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईबाबतचे निवेदन दिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असे कृत्य करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एका बाजूला निवेदने दिली जात असताना नारेगावच्या नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. एखादे घर अनाधिकृत असल्याचे समजल्यानंतर त्यांना बाजू मांडण्याचा वेळ द्यावा लागतो. या दोन दिवसात त्यांनी बाजू मांडली नाही आणि घर अवैध असल्याचे लक्षात आले तर कारवाई केली जाणार आहे.
