छत्रपती संभाजीनगर – मॅनेजमेंट कोट्यातून एम डी मेडिकलच्या शिक्षणासाठी नंबर लावून देण्यासाठी सुरुवातीला ९९ लाख व नंतर ६५ लाखांची मागणी करून ८ लाख उकळल्यानंतर पुन्हा हात वर करुन फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील एका व्यक्तिविरोधात धारूर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित आरोपीवर पंजाबच्या अमृतसरसह महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, जालना, घनसावंगी, धारूर आदी पोलीस ठाण्यात तब्बल ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे नोंद असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक (केज) वेंकटराम यांनी दिली आहे.
या प्रकरणी अविनाश रामचंद्र तोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. तोंडे हे व्यवसायाने वैद्यकीय अधिकारी असून, धारूरजवळील सोनीमोहा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना एस. के. एज्युकेशन संस्थेवरील समाजमाध्यम खात्यावरून नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपुर) याचे सोबत ओळख झाली.
तोंडे यांना एमडी मेडीसीनसाठी मॅनेजमेंट कोटयातून प्रवेश घ्यायचा असल्याने त्यांनी हे व्हॉटसअॅपवरुन सौरभ कुलकर्णी याच्याशी संपर्क साधला होता. आरोपीने कोणत्या सिटला अॅडमिशन पाहीजे ?मी तुमचे मैनेजमेंट कोट्यातून अॅडमिशन करुन देतो, असे म्हणाला.
तोंडे यांनी एम.डी इमर्जन्सीला अॅडमिशन पाहीजे असे सांगितले. आरोपी म्हणाला, वर्धा येथील जवाहरलाल नेहरु मेडीकल येथे अॅडमिशन करुन देतो. त्याची तीन वर्षांची फी ९९ लाख रुपये आहे, पण मी तुम्हास फीस कमी करुन ६५ लाख रुपयात वर्धा येथे अॅडमिशन करुन देतो. २० ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सौरभ कुलकर्णीने एकूण आठ लाख रुपये तोंडे यांच्याकडून रोख व फोन पे च्या माध्यमातून घेतले. शिवाय पहिल्याच यादीत तुमचा प्रवेश होईल, अशी थापही कुलकर्णी याने मारल्याचे तोंडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तोंडे यांनी सौरभ यास दिलेली रक्कम परत करण्यास सांगितले. त्यावर, मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, उलट उत्तर दिले. त्यानंतर ९ जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाणे येथे येवुन वरीलप्रमाणे तक्रार दाखल केली. या गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवुन सहाय्यक पोलीस अधीक्षक वेकंटराम यांनी स्वतःकडे तपास घेतला. पंजाबसह राज्यातील विविध ठाण्यांमध्ये सौरभ कुलकर्णी विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोद असल्याची माहिती घेतली अन १३ जानेवारी रोजी कराड येथे शिताफिने सौरभ कुलकर्णीस ताब्यात घेतल्याचे बीड पोलिसांनी सांगितले.
