छत्रपती संभाजीनगर – भारताच्या ध्वजातील तीन रंग. भगवा (नारंगी), पांढरा व हिरवा आणि त्यातील निळ्या रंगातील अशोकचक्र यामागचे नेमके अर्थ काय किंवा राजकीय पक्षांच्या ध्वज, चिन्हांवरील रंगांतून ध्वनित होणारे अर्थ काय, याविषयी निवडणुकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कुतुहल जागृत होते. बऱ्याचवेळा रंगांना धर्माची जोड दिली जात असली तरी मूळ रंग आणि त्याचे अर्थ काय आहेत, याची उकल मात्र होत नाही. रंगज्ञानाच्या क्षेत्रातील अभ्यासकांकडून जाणून घेतले असता निसर्ग, अध्यात्म, माणसाची स्वभाव गुण वैशिष्टये यांच्याशीही रंगांचा संबंध असून, आजच्या राजकीय परिस्थितीचेही त्यातून उलगडत जातात.
मूळ रंग तीन. लाल, पिवळा व निळा. दुसऱ्या स्तरावर हिरवा-जांभळा व भगवा (नारंगी) हे तीन रंग. षडरंगांचे हे रंग चक्र. या रंग चक्रामध्ये पांढरा व काळा रंग नाही. पांढरा व काळा रंग हे छटा निर्माण करणारे.
लाल रंग हा संकेत (इंडिकेशन) देणारा. प्रेम आणि धोका यांचे सूचन करणारा. निळा – आकाशाचा रंग हा अथांगतेचा विचार सांगणारा. पिवळा रंग विद्यार्थ्यांचा रंग मानला जातो. पूर्वी गुरुशिष्य परंपरेत गुरू भगव्या रंगांची वस्त्रे परिधान करायचे. तर शिष्य पिपळ्या रंगांची. पिवळा रंग शिक्षण घेणाऱ्यांचा ज्ञानमार्गींचा असतो. हिरवा रंग समृद्धीशी जोडलेला आहे. हिरव्या रंगातील शालू परिधान केलेल्या वधूकडे लक्ष्मी, समृद्धी आणणारी म्हणून तिचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. जांभळा रंग हा अधिकार, हुकूमत, राजेशाहीचे प्रतीक आहे. त्यामुळे एखाद्या राजवाड्यासारख्या घरातील पडदे हे जांभळ्या रंगात दाखवण्यात येतात. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक. काही तरी देणाऱ्याचे प्रतीक, अशी माहिती मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी, तसेच येथीलच शासकीय कला महाविद्यालयातील माजी प्राध्यापक व सध्या पुणे येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत असलेले डाॅ. राहुल वेलदोडे यांनी दिली.
डाॅ. वेलदोडे यांनी सांगितले की, सर्व रंग निघून जातात तेव्हा उरतो केवळ पांढरा रंग. पांढरा रंग कोणतीही गोष्ट नाकारतो. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगांचे कपडे त्यामुळेच परिधान केले जातात. नेते मंडळी पांढऱ्या रंगांची कपडे (खादी) वापरतात. म्हणजे एका अर्थाने त्यांच्यावरील आरोप नेते नाकारतात. मोठे घोटाळे जसे नाकारतात तसे. काळ्या रंगांची कपडे वापरणारे गुंड प्रवृत्तीचे दाखवले जातात. सर्व रंगांचे एकत्रिकरण झाल्यानंतर काळारंग आपोआप तयार होतो. सूर्याचा प्रकाशही काळा रंग शोषून घेतो. काहीही शोषणाच्या काळ्या रंगाची क्षमता मानली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगांची कपडे वापरली जात नाहीत.
एखादा रंग आवडण्यामागे मनाच्या स्वभावाचेही एक वैशिष्ट्ये असते. आपण दररोज वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरत असलो तरी एखाद्या प्रसंगी विशिष्ट रंगांचा पोशाख परिधान करण्याच्या कारणामागे स्वभावगुणही असतो. वाळवंटी प्रदेशातील देशांमध्ये हिरव्या रंगाला महत्त्व देण्यामागे समृद्धीचा विचार डोळ्यांसमोर ठेवलेला दिसतो. भारताच्या तिरंग्यामधील भगवा हा त्यागाचे, हिरवा रंग समृद्धीचे, पांढरा वाईट गोष्टी त्यागण्याचे आणि अशोकचक्रातील निळा रंग हा अथांगतेचा विचार दर्शवतो, असे डाॅ. वेलदोडे यांनी सांगितले.
